Mithun Chakraborty Adopted daughter Dishani: मिथुन चक्रवर्ती यांनी जवळजवळ ३५० हून अधिक चित्रपटांत काम केले आहे. त्यांना त्यांच्या कारकिर्दीत डिस्को किंग अशीही ओळख मिळाली. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबरोबरच त्यांच्या व्यावसायिक आयुष्याचीही मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.
कचऱ्याजवळ सापडलेल्या मुलीला मिथुन चक्रवर्तींनी घेतलेले दत्तक
मिथुन यांनी प्रथम अभिनेत्री हेलेना ल्यूक यांच्याशी विवाह केला. मात्र, लग्नाच्या अवघ्या चार महिन्यांतच दोघे वेगळे झाले. त्यानंतर मिथुन यांनी १९७९ साली अभिनेत्री योगिता बाली यांच्याशी लग्न केले. मिथुन चक्रवर्ती आणि योगिता यांना महाक्षय, नमाशी, उष्मेय आणि दिशानी अशी चार मुलं आहेत. मात्र, दिशानीला या जोडप्याने दत्तक घेतले आहे.
दिशानीचा जन्म कोलकात्यात झाला होता. जन्मानंतर तिच्या पालकांनी तिला सोडून दिले होते. एका बंगाली वर्तमानपत्राने याबद्दल माहिती दिली होती, ज्यामध्ये एक लहान बाळ कचऱ्याजवळ सापडल्याचे लिहिले होते. स्थानिकांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यापैकी एकाने बाळाला घरी नेले, अशी माहिती दिली होती. मिथुन यांनी ही बातमी वाचली, त्यानंतर ते त्या मुलीला भेटण्यासाठी गेले. त्या बाळाला वाचवणाऱ्यांकडे त्यांनी बाळाला दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली. पत्नी योगिता बाली यांनी त्यांना पाठिंबा दिला. बाळाला दत्तक घेण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांनी बाळाला घरी आणले, तिचे नाव दिशानी असे ठेवले.
दिशानीला वडिलांप्रमाणेच अभिनय क्षेत्रात काम करायचे होते. तिने माध्यमिक शिक्षण भारतात पूर्ण केल्यानंतर ती पुढच्या शिक्षणासाठी अमेरिकेला गेली. दिशानीने न्यूयॉर्क फिल्म अकादमीमधून पदवीचे शिक्षण घेतले आहे.
२०१७ साली प्रदर्शित झालेल्या ‘गिफ्ट’ या शॉर्ट फिल्ममधून तिने हॉलीवूडमध्ये पदार्पण केले. ‘होली स्मोक’, ‘अंडरपास’, ‘व्हाय डिड यू डू इट?’ अशा शोमध्येदेखील ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली आहे. २०२२ साली प्रदर्शित झालेल्या ‘द गेस्ट’ या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते.
