Mithun Chakraborty struggle story: मिथुन चक्रवर्ती यांनी जेव्हा अभिनय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली, त्यावेळी त्यांना संघर्षाचा सामना करावा लागला. मृगया सिनेमातून त्यांनी पदार्पण केले. या सिनेमासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्यांना काम मिळाले नाही. त्यांची आर्थिक परिस्थिती अशी होती की त्यांना फुटपाथवर राहून दिवस काढावे लागले.

नुकतीच फराह खान कूक दिलीपसह मिथुन चक्रवर्तींच्या मुंबईतील घरी गेली होती. यावेळी तिने मिथुन चक्रवर्ती आणि त्यांच्या मुलांबरोबर गप्पा मारल्या. तसेच, मिथुन चक्रवर्तींच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दलही खुलासा केला.

रात्रीचं जेवण मिळावं म्हणून पार्टीमध्ये डान्स करायचे अन्…

फराह खान मिथुन चक्रवर्तींच्या मुलांना म्हणाली, “मी लहान असताना माझे काका के. के. शुक्ला अमिताभ बच्चन यांच्यासाठी सिनेमे लिहायचे. त्यांच्या पार्ट्यांमध्ये फक्त रात्रीचं जेवण मिळावं म्हणून मी डान्स करण्यासाठी यायचे. त्यांचा संघर्ष मोठा होता. त्यांनी रस्त्यावर, फुटपाथवर झोपून दिवस काढले आहेत.”

मिथून चक्रवर्ती (फोटो सौजन्य: द इंडियन एक्सप्रेस)

यावर मिथुन म्हणाले, “मी रस्त्यावर, बागेत झोपलो आहे; काही वेळा चालताना इतका थकायचो की फुटपाथवरच झोप लागायची. सकाळी उठल्यावर आपण फुटपाथवर झोपलो आहोत हे लक्षात यायचं.”

फराहने मिथुन चक्रवर्तींच्या स्टाईलचे कौतुक केले. मिथुन यांच्या घराबाहेरील जुन्या बीटल कारबद्दल फराहने विचारले. त्यावेळी मिथुन यांचा मुलगा मिमोह म्हणाला, “ही बाबांची पहिली कार आहे. १९७५ मध्ये FTII मधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९७६ मध्ये त्यांचा पहिला चित्रपट आला. राष्ट्रीय पुरस्कार मिळूनही त्यांच्याकडे काम नव्हतं, त्यांचं स्वतःचं घरही नव्हतं, त्यामुळे मुंबईत त्यांनी या कारमध्ये १५ दिवस आयुष्य काढलं. ही त्यांची पहिली कार होती, त्यामुळे ते याच कारमध्ये राहायचे आणि झोपायचे. बाथरुम वापरण्यासाठी ते जिममध्ये झाडू मारण्याचे काम करायचे. त्याच्या बदल्यात त्यांना जिममधील शॉवर वापरण्याची परवानगी मिळायची. ही कार ५० वर्षे जुनी आहे. आम्ही तिची व्यवस्थित देखभाल केली आहे.”

मिथून चक्रवर्ती (फोटो सौजन्य: द इंडियन एक्सप्रेस)

हॉटेल सुरू करण्याबद्दल मिथुन चक्रवर्ती म्हणाले, “तो काळ असा होता की माझे चित्रपट फारसे चांगले चालत नव्हते. काही चित्रपट यशस्वी होत होते, तर काही अपयशी ठरत होते. मला भीती वाटत होती की, जर माझं अभिनेता म्हणून करिअर इथेच संपलं तर स्टारडम गेल्यानंतर पुन्हा कमबॅक करण्याची संधी मला मिळणार नाही. तोपर्यंत मला तीन मुलं झाली होती. माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मी लहानपणी जे पाहिलं होतं, ते माझ्या मुलांनी पाहावं असं मला अजिबात वाटत नव्हतं.”

मिथून चक्रवर्ती (फोटो सौजन्य: द इंडियन एक्सप्रेस)

“उटीमध्ये हॉटेल सुरू केलं”

पुढे ते म्हणाले, “तेव्हा पत्नी पिंकीने सुचवलं की उटीमध्ये हॉटेल सुरू करावं. आम्ही ठरवलं की मी स्वतः हॉटेलमध्ये उपस्थित राहून ते चालवलं तर माझ्या नावामुळे लोक तिथे बुकिंग करतील आणि हॉटेल चांगलं चालेल. तसंच झालं. पण, त्यानंतर माझे चित्रपटही चांगले चालू लागले. ते खूप लकी हॉटेल आहे. ज्या-ज्या लोकांनी तिथे राहून आपल्या चित्रपटांचं शूटिंग केलं, त्या सगळ्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाले आहेत.” ते असेही म्हणाले की, उटीबरोबरच बंगळुरूमध्येही हॉटेल सुरू केले आहे.

मिथुन चक्रवर्ती असेही म्हणाले, “मी भूमिकेची तयारी किमान सहा महिने करायचो, पण चित्रपटाचं शूटिंग एका महिन्यापेक्षाही कमी कालावधीत पूर्ण करायचो. एका वर्षात माझे तब्बल १९ चित्रपट प्रदर्शित झाले होते. माझं नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही नोंदवलं गेलं आहे.”