Mithun Chakraborty Madh Island Bungalow: मिथुन चक्रवर्ती यांनी जेव्हा अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली, त्यावेळी त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. पहिल्याच चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता; पण त्यावेळी मुलाखत घेणाऱ्याकडे जेवण मागण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. आज ते त्यांच्या पिढीतील दिग्गज कलाकारांपैकी एक आहेत.

मिथुन चक्रवर्तींना एकेकाळी रस्त्यावर झोपून काढावे लागलेले दिवस

मिथुन चक्रवर्ती यांनी अनेक मुलाखतींमधून त्यांच्या कठीण काळाबद्दलची माहिती दिली आहे. सिनेमांत काम मिळू लागल्यानंतरही त्यांना काही काळ रस्त्यावर झोपून दिवस काढावे लागले होते. स्वच्छतागृह वापरण्याची परवानगी मिळावी यासाठी ते एका कार्यालयाची साफसफाई करत असत. आज त्यांची भारतात वेगवेगळ्या ठिकाणी मालमत्ता आहे. त्यामध्ये मुंबईतील मढ आयलंड परिसरातील त्यांच्या बंगल्याचा समावेश आहे. हा बंगला जवळजवळ १.५ एकर म्हणजेच सुमारे ६५ हजार चौरस फुटांच्या परिसरात परसलेला आहे.

त्यामध्ये कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी स्वतंत्र कॉटेज आहेत. तसेच २२ श्वान आहेत. त्यामध्ये इन-हाऊस स्टुडिओदेखील उभारण्यात आला आहे. मिथुन यांची मुले या स्टुडिओमध्ये चित्रपटांचे शूटिंग करतात. तसेच वेगवेगळे सेटही तयार करतात. मिथुन यांनी या बंगल्याला मोठ्या मुलाच्या नावावरून ‘मिमोह चक्रवर्ती’ असे नाव दिले आहे.

मिथुन चक्रवर्तींचा बंगला (फोटो सौजन्य: पिंकविला युट्यूब व्हिडीओ)

पिंकविलाशी बोलताना मिथुन यांचा लहान मुलगा नमाशी म्हणाला, “माझ्या मोठ्या भावाचा, मिमोहचा जन्म झाल्यानंतर काही महिन्यांनी १९८५ मध्ये माझ्या आई-वडिलांनी हे घर खरेदी केले होते.”

मिथुन चक्रवर्तींची पहिली गाडी (फोटो सौजन्य:पिंकविला युट्यूब चॅनेल)

प्रत्येकासाठी स्वतंत्र कॉटेज

मढमधील हा बंगला खरेदी केल्यानंतर मिथुन यांचे कुटुंब काही वर्षे उटीला राहत होते. २००७ पर्यंत ते तिथेच राहत होते. त्यानंतर ते पुन्हा मुंबईतील मढ येथील बंगल्यात राहू लागले. या बंगल्याच्या आजूबाजूला भरपूर झाडे लावलेली आहेत. नमाशी म्हणाला, “बाबांना बागकामाची खूप आवड आहे. ते त्यामध्ये व्यग्र असतात.” या बंगल्यात मिथुन चक्रवर्ती यांची पहिली गाडी अजूनही ठेवली असल्याचे पिंकविलाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळाले. या बंगल्यात अनेक दिवाळी पार्टी वर्षानुवर्षे झाल्या आहेत. धर्मेंद्र आणि जितेंद्र यांसारखे दिग्गज कलाकार या पार्ट्यांना पाहुणे म्हणून उपस्थित राहत असत.

मिथुन चक्रवर्तींच्या बंगल्यातील जीम (फोटो सौजन्य: पिंकविला युट्यूब व्हिडीओ)

बंगल्यात प्रत्येकासाठी वेगळे कॉटेज असण्याबद्दल नमाशी म्हणाला, “कुटुंबातील सगळ्यांसाठी स्वतंत्र कॉटेज आहेत. वडिलांना आणि आजोबांना असे वाटत होते की प्रत्येक मुलाला स्वतःची स्वतंत्र जागा असायला हवी.”

त्यापैकी एका कॉटेजचे रूपांतर जिममध्ये करण्यात आले आहे; तर दुसरे कॉटेज पाहुण्यांसाठी आहे. पाहुण्यांच्या कॉटेजच्या समोरील कॉटेजमध्ये मिथुन चक्रवर्ती आणि त्यांची पत्नी मुंबईत असताना राहतात. आणखी एका कॉटेजचे रूपांतर ऑफिसमध्ये करण्यात आले आहे. नमाशीने असाही खुलासा केला की, मिथुन चक्रवर्ती मोठ्या प्रमाणात कोलकात्याला राहतात.

मिथुन चक्रवर्तींना मिळालेले पुरस्कार (फोटो सौजन्य: पिंकविला युट्यूब व्हिडीओ)

बाळासाहेब ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरचे फोटो

मिथुन चक्रवर्ती यांचे ऑफिस पाहताना त्यांच्या कारकि‍र्दीची झलक पाहायला मिळते. ऑफिसमधील एका भिंतीवर त्यांना मिळालेले पुरस्कार, त्याचे फोटो लावण्यात आले आहेत. त्याबरोबरच चाहत्यांनी मिथुन चक्रवर्ती यांची काढलेली स्केचेस आणि पेटिंगही पाहायला मिळतात. ऑफिसमधील दुसऱ्या भिंतीवर मिथुन चक्रवर्ती यांचे नामांकित व्यक्तींबरोबरचे फोटो पाहायला मिळतात. त्यामध्ये कन्नड चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते राजकुमार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरचे फोटो दिसतात. तसेच, मिथुन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्या वेळचा फोटोही पाहायला मिळतो. त्यांना तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले, त्याचे फोटोही तेथे आहेत.

मिथुन चक्रवर्तींचे नामांकित व्यक्तींबरोबरचे फोटो (फोटो सौजन्य: पिंकविला युट्यूब चॅनेल)

नामाशीने असेही सांगितले की, या जागेचा एक भाग ‘मायरंड बंगला’ (Myrnd Bungalow) हा व्यावसायिक स्टुडिओ आहे. चित्रपटांच्या शूटिंगबरोबरच लग्न समारंभांसाठीही हा स्टुडिओ बुक करता येतो. तसेच या बंगल्यात एक खास खोलीही आहे, ज्यामध्ये मिथुन व त्यांची मुले सिनेमाच्या कथा ऐकतात आणि त्यावर चर्चा करतात.

त्यांचा बंगला मोठा असला आणि सगळ्यांचे वेगवेगळे कॉटेज असले तरी त्यांच्या कायमच चर्चा होत असतात. जेवणाबद्दल त्यांच्यात मोठ्या प्रमाणात चर्चा होत असतात. नमाशी म्हणाला, “माझे वडील उत्तम स्वयंपाक करतात. ते चिकन बिर्याणी अप्रतिम बनवतात. आमच्या जेवणाच्या टेबलावर चित्रपटांपेक्षा जेवणाबद्दलच सविस्तर चर्चा होतात.”