Kiara Advani Met Gala 2025 Look: जगातील सर्वात प्रतिष्ठित फॅशन इव्हेंट म्हणून ‘मेट गाला’ ओळखला जातो. दरवर्षी प्रमाणे यंदाही ‘मेट गाला’मध्ये बॉलीवूडच्या कलाकारांचा जलवा पाहायला मिळाला. यंदा ‘मेट गाला’मध्ये शाहरुख खान, कियारा अडवाणी, दिलजीत दोसांझ यांचं जबरदस्त पदार्पण झालं. शाहरुख खान हा ‘मेट गाला’मध्ये सहभागी होणारा पहिला भारतीय अभिनेता ठरला आहे. तसंच कियारा अडवाणीने आपल्या बेबी बंपसह ‘मेट गाला’मध्ये पदार्पण केलं. कियारा देखील पहिल्यांदाच ‘मेट गाला’च्या कार्पेटवर आपला जलवा दाखवण्यासाठी पोहोचली. कियाराच्या सुंदर लूकने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
न्यूयॉर्कच्या मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट येथे ‘मेट गाला २०२५’ ( Met Gala 2025 ) आयोजित केला होता. यावेळी ‘मेट गाला’च्या रेड कार्पेटवर लवकरच आई होणारी कियारा बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली. तिनं गौरव गुप्ताने डिझाइन केलेला काळ्या रंगाचा ऑफ-शोल्डर ड्रेस घातला होता. या ड्रेसच्या पुढच्या भागावर गोल्डन डिटेलिंग होतं. तिचा हा संपूर्ण लूक एका पांढऱ्या रंगाच्या ट्रेलने पूर्ण केला होता.
कियाराच्या बेबी बंपवर गोल्डन रंगाचा हार्ट शेप बनवला होता; ज्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. लवकरच आई होणाऱ्या कियाराने या लूकवर जास्त ज्वेलरी परिधान केली नव्हती. कारण तिचे कानातले आणि अंगठ्यांनी संपूर्ण लूक एकदम सुंदर बनवला होता. तसंच मोकळे कुरळे केस आणि न्यूड मेकअपने कियाराचं सौंदर्य आणखीन खुललं होतं. कियाराने ‘मेट गाला’मधील ( Met Gala 2025 ) लूकचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत कियाराने कॅप्शनमध्ये लिहिलं, “मे महिन्यातील आईचा पहिला सोमवार.” या फोटोंमध्ये कियारा बेबी बंप फ्लॉन्ट करत पोज देताना दिसत आहे.
दरम्यान, ‘मेट गाला’च्या ( Met Gala 2025 ) रेड कार्पेटवर कियारा अडवाणीचा जलवा पाहायला मिळाला असला तरी यावेळी तिच्याबरोबर पती सिद्धार्थ मल्होत्राही होता. दोघांचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कियारा व सिद्धार्थचं २०२३ मध्ये लग्न मोठ्या थाटामाटात झालं होतं. लग्नाच्या दोन वर्षांनंतर दोघं लवकरच आई-बाबा होणार आहेत.