गेले अनेक महिने 'आदिपुरुष' या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटाकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. या चित्रपटात प्रभास श्रीरामांच्या भूमिकेत दिसत आहे, कृती सेनॉन सीतेची भूमिका साकारणार आहे, तर मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे या चित्रपटामध्ये हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या ट्रेलरला आणि चित्रपटातील सर्व गाण्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ येत असतानाच आता या चित्रपटाच्या टीमने प्रेक्षकांना नवीन सरप्राइज दिलं आहे. आज या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. दोन दिवसांपूर्वी 'आदिपुरुष'चा नवीन ॲक्शन ट्रेलर येणार अशी घोषणा करण्यात आली होती. तर आज तिरुपती येथे हा ट्रेलर प्रदर्शित करण्यासाठी एका भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. हा नवीन ट्रेलर पाहण्यासाठी प्रेक्षक खूप आतुर होते. अखेर आज रात्री नऊ वाजता तो प्रदर्शित करण्यात आला. आणखी वाचा : कलाकारांना तगडी फी, व्हीएफएक्सवर मोठा खर्च; ‘आदिपुरुष’चं बजेट माहितेय का? आकडा वाचून व्हाल आवाक् 'आदिपुरुष'चा हा नवीन ॲक्शन ट्रेलर जबरदस्त व्हीएफएक्स आणि ॲक्शनने परिपूर्ण असा आहे. या टरेलरच्या सुरुवातीपासूनच नवे व्हीएफएक्स पाहायला मिळतात. पहिल्या ट्रेलरप्रमाणेच या नवीन ट्रेलरची सुरुवातही रावणाने सीतेला पळवून नेण्यापासून होते. तर यानंतर श्रीराम लक्ष्मण आणि हनुमानाबरोबर सीतेला परत आणण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. यात हनुमान श्रीरामांची अंगठी घेऊन सीतेकडे जातो अशी काही नवीन दृश्यंही दाखवण्यात आली आहेत. तर याचबरोबर या नवीन ट्रेलरमध्ये वानर सेना आणि रावणाच्या सेनेमध्ये धुवाधार युद्ध होताना दिसत आहे. आणि या ट्रेलरच्या अखेरीस श्रीराम हनुमानाच्या पाठीवर बसून रावणाचा वध करताना दिसत आहेत. हेही वाचा : प्रदर्शनाच्या आधीच ‘आदिपुरुष’चा होणार वर्ल्ड प्रीमियर, जाणून घ्या कधी, कुठे आणि कोणाला पाहता येणार चित्रपट? हा नवीन ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर यावर प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. हा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर तासाभरातच या ट्रेलरला लाखांच्या घरात व्ह्यूज मिळाले आहेत. हा बहुप्रतिक्षित चित्रपट १६ जून रोजी प्रदर्शित होईल.