Mouni Roy alleges harassment: मौनी रॉय ही टीव्ही आणि बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने काही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता मात्र अभिनेत्री एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.
तिने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत एका कार्यक्रमात तिला वाईट वागणूक मिळाल्याचा खुलासा केला आहे. तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचे तिने म्हणले आहे. अभिनेत्री नेमकं काय म्हणाली आहे हे जाणून घेऊ…
हरियाणातील कर्नाल येथील एका कार्यक्रमात ही घटना घडली आहे. मौनीने लिहिले, “नुकताच कर्नालमध्ये एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमातील पाहुण्यांच्या वागण्याने मला खूप वाईट वाटले. विशेषतः दोन काका जे आजोबा होण्याच्या वयाचे होते. कार्यक्रम सुरू होताच ते काका आणि कुटुंबातील इतर पुरूष स्टेजवर आले. त्यांनी माझ्या कमरेवर हात ठेवून फोटो काढले. मला ते आवडले नाही. मी त्यांना सांगितले की सर कृपया तुमचा हात काढा.”
“त्यांनी मला अश्लील हातवारे करत…”
“दोन काका अगदी समोर उभे होते आणि अश्लील शेरेबाजी करत होते. त्यांनी मला अश्लील हातवारे करत नावाने हाक मारली. मला ते लक्षात आले. सुरुवातीला मी त्यांना नम्रपणे सांगीतले की असे करू नका. त्यानंतर त्यांनी माझ्यावर गुलाब फेकायला सुरुवात केली. परफॉर्मन्स सुरू असताना मी मधूनच बाहेर जाण्याच्या दिशेने चालत गेले पण लगेचच माझा परफॉर्मन्स पूर्ण करण्यासाठी परत गेले होते.”
मौनीने पुढे लिहिले, “कुटुंबातील कोणीही किंवा आयोजकांनी त्यांना थांबवले नाही. जर माझ्यासारख्या एखाद्याला यातून जावे लागले तर नवीन मुली जेव्हा काम करायला आणि शो करायला सुरुवात करतात तेव्हा काय घडत असेल याची मी फक्त कल्पना करू शकते. मला धक्का बसला आहे.मला अपमानित वाटत आहे.मला मिळालेल्या अशा वागणूकीसाठी अधिकाऱ्यांनी कारवाई करावी अशी माझी इच्छा आहे. आम्ही कलाकार आहोत, आम्ही आमच्या कामातून प्रामाणिकपणे जीवन जगण्याचा प्रयत्न करतो.”
अभिनेत्रीने खुलासा करत लिहिले, “स्टेज खूप उंच होता आणि ते काका लो अँगलमधून व्हिडिओ बनवत होते. जेव्हा त्यांना कोणीतरी थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी शिवीगाळ केली. माझं माझ्या देशावर, येथील लोकांवर, परंपरावर प्रेम आहे. पण हे काय आहे? असे धाडस कुठून येते? पुरूष आहे म्हणून असे वागण्याचा त्यांचा हक्क आहे, असे त्यांना वाटते.”
तिने तिच्या पोस्टचा शेवट असा केला की, “मी कधीही माझ्याबरोबर घडलेल्या नकारात्मक गोष्टीबद्दल सोशल मीडियावर सांगत नाही. पण, हे जे काही घडले ते व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. आम्ही कलाकार म्हणून अशा कार्यक्रमांत वधू आणि वराला आशीर्वाद देण्यासाठी जातो. आम्ही त्यांचे पाहुणे म्हणून जातो आणि ते आम्हाला अशा प्रकारे त्रास देतात”, असे लिहित मौनीने तिच्याबरोबर नेमके काय घडले हे सांगितले आहे.
