Actress Mouni Roy And Suraj Nambiar Divorce Updates : प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री मौनी रॉयने आपल्या नवऱ्याला इन्स्टाग्रामवरून अनफॉलो केल्याने दोघांच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरू होत्या. तिने नवऱ्याबरोबरचे काही फोटोही डिलीट केले होते. याशिवाय मौनीची जवळची मैत्रीण अभिनेत्री दिशा पाटनीने सुद्धा सूरज नांबियारला अनफॉलो केलं होतं. आता या सगळ्या चर्चांदरम्यान अखेर मौनी व सूरज या दोघांनी संयुक्त निवेदन जारी करत ‘विभक्त’ झाल्याचं जाहीर केलं आहे.

मौनी या निवेदनात लिहिते, “आम्ही सर्वांना एक नम्र विनंती करू इच्छितो की, कृपया आमच्या प्रायव्हसीचा आदर करा. माझ्या किंवा सूरजबाबत कोणत्याही अफवा पसरवू नका. या कठीण काळात तुम्ही आमची प्रायव्हसी जपाल अशी आमची अपेक्षा आहे. सर्व प्रसारमाध्यमांनाही आमची नम्र विनंती आहे की, कृपया हे थांबवा. आम्हाला आमचं आयुष्य जगू द्या.”

“प्रसारमाध्यमांनी आमच्या वैयक्तिक आयुष्यात विनाकारण हस्तक्षेप केला, याबद्दल मला अत्यंत खेद वाटतो. आज मी हे स्पष्ट करू इच्छिते की, आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. या कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी आम्ही दोघंही आवश्यक तो वेळ घेत आहोत. यादरम्यान, माझ्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले गेले. आता आम्ही परस्पर संमतीने आमच्या आयुष्याचे मार्ग बदलत वेगवेगळ्या वाटांनी पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यातही आमची मैत्री जपण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू.” असं मौनीने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

सूरज नांबियारबद्दल सांगायचं झालं, तर तो दुबईमध्ये स्थायिक आहे. सूरज Investment Banker असून तो मूळचा बंगळुरूचा आहे. या जोडप्याने जानेवारी २०२२ मध्ये गोव्यात लग्नगाठ बांधली होती. मल्याळी आणि बंगाली अशा दोन्ही संस्कृतीनुसार या दोघांचा विवाहसोहळा पार पडला होता.

दरम्यान, सूरज आणि मौनीची पहिली भेट २०१९ मध्ये झाली होती. तेव्हापासूनच यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात झाली. मौनी-सूरजने अनेक वर्षे त्यांचं नातं रिव्हिल केलं नव्हतं. जवळपास २-३ वर्षे एकमेकांना डेट केल्यावर या जोडप्याने २०२२ मध्ये लग्नगाठ बांधली. आता लग्नानंतर ४ वर्षांनी दोघंही विभक्त झाले आहेत.