Moushumi Chatterjee on superstar rajesh khanna : बॉलीवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या चित्रपटांनी चित्रपटगृहांत धुमाकूळ घातला होता. ७० च्या दशकात सलग सुपरहिट चित्रपट देत त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. आराधना, आनंद, कटी पतंग, अमर प्रेम यांसारख्या चित्रपटांमुळे ते यशाच्या शिखरावर पोहोचले. राजेश खन्ना म्हटलं की, चित्रपट गाजणारच, असं जणू समीकरणच बनलं होतं. त्यांचा रोमँटिक अंदाज आणि प्रभावी अभिनय यांमुळे राजेश खन्ना लोकप्रियतेचा सुवर्णकाळ अनुभवत होते.
पडद्यावर गाजत असलेले हे नाव पडद्यामागे मात्र वादाच्या भोवऱ्यात अडकले. सेटवर त्यांचे अभिनेत्रींशी वागणे, वैयक्तिक आयुष्यावरून बोलणे याबाबत अनेक अभिनेत्रींनी धक्कादायक खुलासे केले आहेत. एका लोकप्रिय अभिनेत्रीने राजेश खन्नासोबत काम करताना आलेले अनुभव सांगताना पतीबाबत संतापजनक प्रश्न विचारल्याचे सांगितले.
राजेश खन्ना यांना सेटवर उशीरा येण्याची सवय
अनुराग, प्रेम बंधन व भोला भला या चित्रपटांमध्ये सुपरस्टार राजेश खन्नांसोबत काम करणाऱ्या अभिनेत्रीने त्यांचे अनुभव सांगितले आहेत. कामाव्यतिरिक्त राजेश खन्ना कसे होते याबाबत तिने वक्तव्य केले. यापूर्वीही राजेश खन्ना यांच्या सहकलाकार आणि दिग्दर्शकांनी अभिनेत्याच्या नखऱ्यांबद्दल आणि सेटवर नेहमी उशिरा येण्याच्या सवयीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता अभिनत्री मौसमी चॅटर्जी यांनी राजेश खन्नांसोबतच्या कामाचा अनुभव सांगितला आहे.
ही राजेश खन्नांच्या कर्माची फळं – मौसमी
अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीत राजेश खन्नांबाबत गौप्यस्फोट करीत त्यांच्या लोकप्रियतेचा कसा प्रभाव पडत होता हे सांगितले. त्यांनी राजेश खन्ना यांच्याबाबत बोलताना, “ते फार बिघडलेले होते, इंडस्ट्रीत मोठ्या प्रमाणात यश मिळाल्याने ते गर्विष्ठ होते,” असे परखड भाष्य केले. तसेच राजेश यांची लोकप्रियता कमी झाल्यानंतर ते नैराश्यात गेले. याबाबत मौसमी म्हणाल्या की, ही त्यांच्या (राजेश खन्ना) कर्माची फळं आहेत. तुम्ही तुमचं आयुष्य अशा प्रकारे जगता की, तुम्ही जे नाही ते असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न करता, असे त्या म्हणाल्या आहेत.
राजेश खन्ना यांचा अभिनेत्रीला संतापजनक प्रश्न
७० ते ८० दशकाच्या काळातील बॉलीवूडच्या कलाकारांबाबत मौसमी चॅटर्जी म्हणाल्या की, त्यावेळी जो कोणी लोकप्रिय होता किंवा यशाच्या सर्वोच्च स्थानी होता, त्याला वाटे की इतरांनी माझ्या गोष्टी ऐकल्याच पाहिजेत. आणि सिनेविश्वामध्ये आधीपासून हे असंच आहे. ‘लहरें रेट्रो’ला दिलेल्या एका आधीच्या एका मुलाखतीत त्यांनी राजेश खन्नांनी विचारलेल्या प्रश्नामुळे अस्वस्थ झाल्याचे सांगितले. राजेश खन्ना यांनी एकदा मौसमीच्या मुलींचे वडील कोण यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. राजेश यांनी विचारले होते की, मौसमी यांच्या मुलीचे वडील हे खरंच पती जयंत मुखर्जी आहेत की विनोद मेहरा आहेत, असा संतापजनक प्रश्न विचारल्याचे अभिनेत्रीने सांगितले. राजेश खन्ना यांनी अनेकदा घाणेरडे डाव खेळले होत. ते आता आपल्यात नाहीत; पण मी त्यांच्या शेवटच्या दिवसांत भेटायलाही गेले होते, असे मौसमी चॅटर्जी म्हणाल्या आहेत.
लोकप्रिय कलाकारांना नंतर येते नैराश्य
त्याचबरोबर प्रचंड लोकप्रियतेनंतर येणाऱ्या एकटेपणाबद्दल मौसमी चॅटर्जी यांनी सांगितले, “जर तुम्ही म्हणत असाल की, प्रत्येक जण एकटा असतो, तर तुम्हाला तुमच्या एकटेपणाच्या वेळेचा आनंद कसा घ्यायचा हे माहीत असले पाहिजे. एकटेपणा जाणवू देऊ नका. मला एकटे राहायला आवडते. आयुष्यात प्रत्येक जण यातून जातो. किशोर कुमार, मधुबाला प्रत्येक जण यातून गेला आहे. जे काही घडत आहे, ते सर्व तुमच्या आयुष्याचाच एक भाग आहे; पण ते म्हणजे तुमचं संपूर्ण आयुष्य नाही, असे मत अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांनी व्यक्त केले.
