Moushumi Chatterjee on Rajesh Khanna: बॉलीवूडचे कलाकार हे जितके त्यांच्या व्यावसायिक आयुष्यामुळे ओळखले जातात, तितकेच ते त्यांच्या खासगी आयुष्यामुळेदेखील ओळखले जातात. कलाकार मुलाखतींमधून त्यांना आलेले अनुभव, तसेच सहकलाकारांच्या आठवणी सांगतात.

मौसमी चॅटर्जी या बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्यांचे अनेक सिनेमे गाजले आहेत. मौसमी चॅटर्जी यांनी बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहेत. त्यांनी धर्मेंद्र, अमिताभ बच्चन व राजेश खन्ना यांच्याबरोबर मोठ्या प्रमाणात काम केले.

तिने अमिताभ बच्चन यांच्यासह मंजिल, रोटील कपडा और मकान, पीकू अशा गाजलेल्या चित्रपटांत काम केले आहे. तसेच, राजेश खन्ना यांच्याबरोबर हमशक्ल, भोला भाला आणि प्रेम बंधन अशा सिनेमांत काम केले आहे.

एका मुलाखतीत मौसमी चॅटर्जी यांनी अमिताभ बच्चन व राजेश खन्ना यांची तुलना केली होती. दोन्ही कलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेत्रीने दोन्ही कलाकारांचे स्वभाव, त्यांनी स्टारडम कसे सांभाळले तसेच सेटवर ते कसे वावरत असत, याबद्दल वक्तव्य केले.

“अमिताभ बच्चन यांना खूप…”

फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत मौसमी चॅटर्जी म्हणालेल्या, “मी अमिताभ बच्चन यांना कधीच त्यांच्या चमच्यां(मर्जीतील लोक) बरोबर पाहिले नाही. ज्यांची गरज नाही, असे लोक त्यांच्याबरोबर नसत. पण, राजेश खन्नांबरोबर कायम त्यांचे चमचे असत. त्यांना कायम लक्ष वेधून घ्यायची सवय होती. लोकांकडून लाड करून घ्यायची सवय होती.”

मौसमी असेही म्हणालेल्या, “अमिताभ बच्चन यांना खूप यश मिळाले. पण, त्यानंतरही त्यांचे पाय कायम जमिनीवर राहिले. मात्र, राजेश खन्नांना हे जमले नाही. ते यशामध्ये बुडाले. एक शिकलेला गुंड आणि अशिक्षित गुंड यांच्यात फरक असतो, असे म्हणतात.इतके यश मिळूनही राजेश खन्नांना अपयश पाहावे लागले, त्याचे दु:ख वाटते.”

मौसमी यांनी असाही खुलासा केलेला की सुरुवातीला त्यांना चांगले हिंदी बोलता येत नसे. तेव्हा, राजेश खन्ना त्यांना शिव्या द्यायला शिकवत असत आणि त्यांची मजा घेत असत. अभिनेत्री म्हणाल्या, “ते मला शिव्या द्यायला शिकवत असत. मीसुद्धा त्यांनी शिकवल्याप्रमाणे बोलत असे. मी खूप भोळी होते. मला त्या शिव्यांचा अर्थ माहित नसे.”

मौसमी चॅटर्जी यांच्या करिअरबद्दल बोलायचे तर त्यांनी १९६७ ला प्रदर्शित झालेल्या बालिका वधू या सिनेमातून त्याच्या अभिनय क्षेत्रातील कामाला सुरुवात केली होती. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. त्यानंतर अभिनेत्रीला अनेक सिनेमांसाठी ऑफर मिळाल्या.७० च्या दशकात त्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी होत्या. आजही त्या विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या आरी सिनेमात त्या महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या होत्या.