Moushumi Chatterjee on Rajesh Khanna: मौसमी चॅटर्जी या बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी आजवर अनेक सिनेमांत काम करीत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. १९७२ मध्ये शक्ती सामंता यांच्या ‘अनुराग’ चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या सिनेमात त्यांनी एका अंध मुलीची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यांनी ‘प्रेम बंधन’, ‘हमशकल’, ‘नैना’, ‘तुम्हारी कसम’ अशा अनेक सिनेमांत विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

मौसमी चॅटर्जींचे ‘या’ कलाकारांबरोबर सर्वाधिक काम

मौसमी चॅटर्जी यांच्या अभिनयाबरोबरच त्यांची अनेक वक्तव्येदेखील चर्चेत आहेत. मौसमी चॅटर्जी विविध मुलाखतींमध्ये त्यांच्या चित्रपटांतील किस्से सांगतात, त्यांच्या सहकलाकारांबद्दल वक्तव्ये करतात. त्यांनी यापूर्वी राजेश खन्नांबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला. तसेच, अमिताभ बच्चन सहकलाकार म्हणून कसे आहेत, याबद्दलही त्यांनी सांगितले. तसेच, राजेश खन्ना व अमिताभ बच्चन यांची तुलनादेखील त्यांनी केली होती.

मौसमी चॅटर्जी व राजेश खन्ना यांची १९७४ मध्ये हमशकल या सिनेमाच्या सेटवर पहिल्यांदा भेट झाली होती. राजेश खन्ना व मौसमी चॅटर्जी यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत होती; पण खऱ्या आयुष्यात मात्र त्यांच्यात अनेकदा वाद होत असत.

मौसमी चॅटर्जी व अमिताभ बच्चन यांनीदेखील स्क्रीन शेअर केली आहे. १९७४ ला प्रदर्शित झालेल्या बेनाम सिनेमात त्यांनी पहिल्यांदा एकत्र काम केले होते; तर १९७९ ला प्रदर्शित झालेल्या मंझिल या सिनेमातही ते एकत्र दिसले होते. या सिनेमातील रिमझिम गिरे सावन हे गाणे लोकप्रिय ठरले होते. या गाण्याचे शूटिंग मुंबईतील मुसळधार पावसात झाले होते.

तसेच मौसमी चॅटर्जी यांनी शशी कपूर यांच्याबरोबरही काही सिनेमांत काम केले आहे. स्वयंवर, घर एक मंदिर व नैना या सिनेमांत ते एकत्र दिसले होते. त्याबरोबरच त्यांनी विनोद मेहरा यांच्याबरोबर १० हून अधिक सिनेमांत काम केले होते. त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडत होती. त्यामुळे विवाहित असूनही विनोद मेहरा आणि मौसमी चॅटर्जी यांच्या रिलेशनशिपची चर्चा चांगलीच रंगली होती. या सगळ्यात राजेश खन्नांनी गर्भवती असलेल्या मौसमी चॅटर्जी यांना विचारलेले की, हे मूल तुझ्या पतीचे आहे की विनोद मेहराचे? त्यावर मौसमी चॅटर्जी यांनीदेखील त्यांना तसेच उत्तर दिले होते.

राजेश खन्ना मौसमी चॅटर्जींच्या मुलीला काय म्हणालेले?

असे असले तरी राजेश खन्नांच्या शेवटच्या दिवसांत मौसमी चॅटर्जी त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या मुलीसह गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यात काय संवाद झाला होता, याबद्दलही त्यांनी खुलासा केला होता. त्या म्हणालेल्या, “आज राजेश खन्ना आपल्यात नाहीत. त्यांच्या शेवटच्या दिवसांत मी त्यांना भेटण्यासाठी गेले होते. माझ्या लहान मुलीसमोर त्यांनी माझे कौतुक केले. ते तिला म्हणाले की, तुझी आई वेडी होती. आम्ही सगळे तिला घाबरायचो. ती कुठल्याच चुकीच्या गोष्टी ऐकून घेत नसे.”

दरम्यान, राजेश खन्ना यांचे २०१२ मध्ये निधन झाले.