अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांना बालिका वधू या सिनेमातून मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर मौसमी यांच्या कुटुंबाने त्यांचे दिग्गज संगीतकार आणि गायक हेमंत कुमार यांचा मुलगा जयंत मुखर्जी यांच्याबरोबर लग्न ठरवले. तेव्हा त्यांचे वय १२ ते १५ दरम्यान होते. मौसमी अनेकदा त्यांच्या लग्नाबद्दल, आईपणाबद्दल मोकळेपणाने बोलत असतात. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी त्या मुलीला काय सल्ला देतात याबद्दल सांगितले.

जागरण फिल्म फेस्टिव्हल २०२६ मध्ये नयनदीप रक्षितला दिलेल्या मुलाखतीत मौसमी चॅटर्जी म्हणाल्या, “मी माझ्या मुलीला सांगते की तुला बॉयफ्रेंड असेल तर हरकत नाही, पण तू त्या मुलाबरोबर लग्नच केले पाहिजे असे नाही.”

तिथे उपस्थित असलेल्या महिलांना उद्देशून त्या म्हणाल्या, “मुलींनी काळजीपूर्वक राहिलं पाहिजे. आता थोडं स्वार्थी आणि स्वतःचा विचार करणारे व्हा, कारण आता काळ बदलला आहे. गीतेतही म्हटलं आहे की बदल हा निसर्गाचा नियम आहे.”

मौसमी पुढे म्हणाल्या, “आता बदल झाला आहे आणि पूर्वीच्या काळाच्या तुलनेत आपण पुढे आलो आहोत. आपण आपल्या मुलींना सासरच्या घराची काळजी घ्यायला शिकवतो, पण आपल्या मुलांना मात्र ते शिकवत नाही. घरातील कामं ही स्त्रियांनीच करायची असतात, पुरुषांचं ते काम नाही असा आपला समज असतो. आजची तरुण पिढी इतकी तणावाखाली आहे की, त्यांना त्यांच्या आयुष्याचा आनंदही घेता येत नाही, त्यांच्याकडे स्वतःसाठी वेळच नाही.”

त्या असेही म्हणाल्या, “इतरांना काही सिद्ध करण्यासाठी काहीही करू नका. आता माझं वय ७० वर्ष आहे. तुम्हाला जे आवडतं ते करा, पण अतिरेक करू नका. एखादी चूक एकदा झाली तर ती पुन्हा करू नका. माझ्याकडूनही आयुष्यात चुका झाल्या आहेत, पण एखादी गोष्ट चुकीची आहे हे लक्षात आल्यानंतर मी ती पुन्हा कधीच केली नाही.”

दरम्यान, २०१९ मध्ये मौसमी यांच्या मोठ्या मुलीचे पायलचे निधन झाले. ती दीर्घकाळापासून मधुमेहाचा सामना करत होती. त्यांची लहान मुलगी मेघा व पायल यांच्यात आठ वर्षांचे अंतर होते.