भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील ‘मिस्टर इंडिया’ हा एक मैलाचा दगड मानला जातो. अनिल कपूर, श्रीदेवी आणि अमरीश पुरी यांच्या अभिनयाने सजलेल्या या चित्रपटात बालकलाकारांनीही जीव ओतला होता. यात सर्वात जास्त प्रेम मिळाले ते म्हणजे निरागस ‘टीना’ला. टीना ही भूमिका साकारणारी बालकलाकार हुजान खोदायजी (Huzan Khodaiji) आता मोठी झाली असून तिचा लूक पूर्णपणे बदलला आहे. एकाच चित्रपटातून तुफान लोकप्रियता मिळवूनही हुजानने चंदेरी दुनियेला कायमचा निरोप दिला.
‘मिस्टर इंडिया’ हा चित्रपट ३९ वर्षांपूर्वी, म्हणजेच १९८७ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यातील संवाद, गाणी आणि कलाकार आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करतात. या चित्रपटातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या चित्रपटात एक छोटी मुलगी दिसली होती, जिने ‘टीना’ ची भूमिका साकारली होती. तिचा निरागस चेहरा आणि भोळे डोळे जणू लोकांच्या मनात घर करून बसले. ही चिमुकली आता मोठी झाली असून, तिला आता पाहिलं तर कोणीच ओळखू शकणार नाही. मोठ्या पडद्यावर फक्त एकच चित्रपट करून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री म्हणून हुजान खोदायजी (Huzan Khodaiji) ओळखली जाते. १९८० च्या दशकात गाजलेल्या एका ब्लॉकबस्टर चित्रपटामुळे आजही प्रेक्षकांमध्ये तिची चर्चा होत असते.
हुजान खोदायजीचं बालपण
हुजान खोदायजीचा जन्म एका पारशी कुटुंबात झाला. तिचे बालपण मुंबईत गेले. हुजानला लहानपणापासून अभिनयाची फारशी ओढ नव्हती आणि तिने सिनेसृष्टीत यायचं असं काही ठरवलंही नव्हतं. हुजानच्या करिअरची सुरुवात आणि शेवट हा १९८७ मध्ये आलेल्या ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटाने झाला. या चित्रपटात तिने अनिल कपूरच्या घरी राहणाऱ्या लहान मुलांपैकी एक, म्हणजेच ‘टीना’ ची भूमिका साकारली होती.
मिस्टर इंडियामधील तिची भूमिका
‘मिस्टर इंडिया’मध्ये टीना हे सर्वात लाडके पात्र होते. चित्रपटात शेवटी तिचा मृत्यू होतो, असं दाखवण्यात आलंय. त्या सीनने त्याकाळी प्रेक्षकांना खूप रडवलं होतं. एकाच चित्रपटाने तिला संपूर्ण देशात प्रसिद्धी मिळवून दिली. ‘मिस्टर इंडिया’च्या प्रचंड यशानंतर हुजानला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या होत्या. मात्र, तिने सिनेसृष्टीत न राहण्याचा निर्णय घेतला.

हुजानला तिचे शिक्षण पूर्ण करायचे होते. बालकलाकार म्हणून काम केल्यानंतर तिला ग्लॅमरपेक्षा अभ्यासात अधिक रस होता. तिला अभिनयाची फारशी आवड उरली नव्हती. प्रसिद्धीच्या झोतात राहण्यापेक्षा सामान्य आयुष्य जगण्याकडे तिचा कल होता.
अभिनयाबद्दल काय म्हणाली होती हुजान खोदायजी?
हुजान सोशल मीडियापासूनही लांब राहते. तिचे इन्स्टाग्रामवर प्रोफाइल आहे, पण ते प्रायव्हेट आहे. एका मुलाखतीत आपल्या अभिनय करिअरबद्दल हुजान खोदायजी व्यक्त झाली होती. तिला मिळणारी प्रसिद्धी नको होती. “चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर मी मद्रासला (चेन्नई) गेले होते. माझ्या आई-वडिलांचे काही मित्र कास्टिंग डायरेक्टर होते. मी एका ऑडिशनला गेले आणि माझी निवड झाली. त्यानंतर मी काही जाहिरातींमध्येही काम केलं, पण लोकांनी मला अटेंशन दिलं की मला खरंच खूप लाज वाटायची,” असं ‘स्कूपव्हूप’ला दिलेल्या मुलाखतीत हुजान म्हणाली होती.

हुजान खोदायजी आता काय करते?
हुजान खोदायजी आता चंदेरी दुनियेपासून पूर्णपणे दूर आहे. ती सध्या जाहिरात क्षेत्रात कार्यरत आहे. तिने अनेक वर्षे ‘लिंटास’ (Lintas) सारख्या मोठ्या जाहिरात कंपनीत ‘क्रिएटिव्ह डायरेक्टर’ म्हणून काम केलं आहे. हुजान विवाहित असून तिला दोन मुली आहेत. ती चेन्नईमध्ये स्थायिक असल्याचं म्हटलं जातं.
काही वर्षांपूर्वी ‘मिस्टर इंडिया’च्या कलाकारांचे एक रीयुनियन झाले होते, तेव्हा हुजानचे फोटो समोर आले होते. तिला पाहून अनेकांना जुन्या आठवणी ताज्या झाल्या. जरी तिने फक्त एकच चित्रपट केला, तरी ‘टीना’ म्हणून तिला आजही सिनेप्रेमी विसरू शकलेले नाहीत.
