Mrunal Thakur Talk About Relationship Rumors With Dhanush : मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर तिच्या कामाबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत येत असते. मृणाल आणि दाक्षिणात्य अभिनेता धनुष एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहेत. यावर आता मृणालने प्रतिक्रिया दिली आहे.
मृणाल ठाकूर व धनुष दोघांच्या डेटिंगच्या अफवा ‘सन ऑफ सरदार २’च्या इव्हेंटपासून सुरू झाल्या होत्या. या इव्हेंटला त्याने हजेरी लावली होती. डेटिंगच्या अफवांवर मृणालने अद्याप थेट प्रतिक्रिया दिली नव्हती, मात्र नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने स्पष्ट केले की, सध्या तिच्याकडे कोणालाही डेट करण्यासाठी वेळ नाही.
“यामुळे मी खूप अस्वस्थ व्हायचे पण…”
पत्रकार प्रेमा यांच्या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत मृणालने डेटिंगच्या अफवांबद्दल नाराजी व्यक्त केली. ती म्हणाली, “सुरुवातीला या गोष्टींमुळे मी खूप अस्वस्थ व्हायचे, पण आता मी त्याकडे दुर्लक्ष करायला शिकले आहे. मात्र, अशा अफवांनी जी प्रतिमा तयार होते, त्याचा परिणाम माझ्या कामावर होतो. कधीकधी लोकांच्या चुकीच्या समजामुळे माझ्याकडे येणाऱ्या भूमिकांवर परिणाम होऊ शकतो.”
“कोणत्याही कलाकाराच्या चारित्र्यावर…”
मृणाल पुढे म्हणाली की, तिचा कर्मावर विश्वास आहे. “कदाचित गेल्या जन्मी माझ्याकडून काही चुका झाल्या असतील, ज्याचे फळ मी या जन्मी भोगत आहे, असे समजून मी पुढे जाते. जेव्हा लोक कोणत्याही कलाकाराच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतात, तेव्हा मला वाईट वाटतं. मला माझ्या कामामुळे ओळखले जावे असे वाटते, मी कोणाला डेट करतेय यामुळे नाही”, असं ती स्पष्टपणे म्हणाली.
“मी जेव्हा कोणाच्या प्रेमात पडेल, तेव्हा…”
मृणालला सध्या स्वतःच्या प्रकृतीकडेही लक्ष द्यायला वेळ नसल्याचे तिने सांगितले. ती म्हणाली, “पायाचा लिगामेंटच्या उपचारासाठी दवाखान्यात जायलाही माझ्याकडे वेळ नाही, तर वैयक्तिक आयुष्यासाठी वेळ कुठून असणार? मी खूप मनमोकळ्या स्वभावाची मुलगी आहे. जर मला एखाद्या मित्राने साधे फूल जरी दिले, तरी मी त्याचा फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट करते. त्यामुळे जेव्हा मी कोणाच्या प्रेमात पडेल, तेव्हा स्वतःहूनच सर्वांना सांगेन.”
दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात मृणाल-धनुषच्या लग्नाचे काही एआय (AI) जनरेटेड व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याबद्दल बोलताना मृणाल म्हणाली होती की, “हा प्रकार खूप भीतीदायक आहे. लोक केवळ व्ह्यूज मिळवण्यासाठी अशा अफवा पसरवतात.”
मृणाल ठाकूरच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, तिची आणि अदिवी शेष यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘डकैत’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
