Mrunal Thakur Talks About Ranveer Singh : मृणाल ठाकूर मनोरंजनविश्वातील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे. ज्यांनी अभिनयाचा कोणताही वारसा नसताना स्वबळावर इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. पण, अशाताच आता मृणालने ती सध्या ‘धुरंधर २’मुळे चर्चेत असलेल्या रणवीर सिंहमुळे या इंडस्ट्रीत आहे असं म्हटलं आहे.

मृणाल ठाकूर सध्या तिच्या Dacoit या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. १० एप्रिल रोजी चित्रपटगृहात हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. यानिमित्त मृणालने एक मुलाखत दिली आहे. त्यामध्ये तिने रणवीर सिहंबद्दल भाष्य करत त्याच्यामुळे ती या इंडस्ट्रीत असल्याचं म्हटलं आहे. मृणाल रणवीरबद्दल नेमकं काय म्हणाली आणि हा किस्सा नेमका काय आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

रणवीर सिंह सध्या आदित्य धर लिखित व दिग्दर्शित ‘धुरंधर २’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याच्या या चित्रपटाने अनेक सुपरहिट चित्रपटांचे बॉक्स ऑफिसवरचे रेकॉर्ड मोडले. तर जगभरातही कोट्यवधींचा गल्ला जमावला. शिवाय चित्रपटातील त्याच्या कामासाठीसुद्धा त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. अलीकडेच त्याला ‘धुरंधर’ या गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या चित्रपटासाठी ‘चेतक स्क्रीन अवॉर्डस्’मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. अशताच आत मृणालनेसुद्धा त्याचं कौतुक करत एक जुना किस्सा सांगितला आहे.

मृणाल ठाकूरने सांगितला रणवीर सिंहबरोबरचा किस्सा

रणवीर अलाहाबादियाला दिलेल्या मुलाखतीत तिने याबद्दल सांगितलं आहे. यावेळी तिला आपण रणवीर सिंहबद्दल बोलू शकतो का? असं विचारलं असता ती उत्सुक होत म्हणाली, “हो…” पुढे तिला ‘धुरंधर २’ पाहिला का असं विचारल्यानंतर ती म्हणाली, ‘नाही. मी दुसरा भाग अजून पाहिलेला नाहीये. मी त्याच्यासाठी खूप आनंदी आहे. रणवीर सिंह माझा लकी चार्म आहे. कारण- मी त्याच्यामुळेच आज या इंडस्ट्रीत आहे. मी त्याच्याबरोबर एका जाहिरातीमध्ये काम केलं होतं. एका हेअर ब्रँडसाठी मॉडेल म्हणून मी त्याच्याबरोबर काम केलं आणि जेव्हा ती जाहिरात प्रदर्शित झाली त्यानंतर मला चित्रपटांसाठी विचारणा होऊ लागली. म्हणून मी त्याला याचं श्रेय देते. त्याने मला खूप मदत केली आहे. तो खूप सकारात्मक व्यक्ती आहे. त्याला असंच यश मिळत राहु दे.”

‘धुरंधर’मधील रणवीरच्या अभिनयाबद्दल मृणाल म्हणाली, “मी त्याच्याकडे रणवीर म्हणून पाहिलंच नाही. मी हमझा म्हणूनच पाहिलं. ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे की दिग्दर्शक आदित्य धरने प्रत्येक पात्राला न्याय मिळवून दिला. मला रणवीर सिंहचा खूप अभिमान आहे. तो खूप मेहनती आहे. मी अशी इच्छा व्यक्त करते की त्याचे सर्व चित्रपट सुपरहिट ठरो.”