Mrunal Thakur Talks About Madhuri Dixit : मृणाल ठाकूर बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मृणालने अभिनयाचा कोणताही वारसा नसताना तिच्या अभिनयशैलीने आणि मेहनतीच्या जोरावर मनोरंजनविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. टेलिव्हिजनपासून सुरू झालेला तिचा प्रवास चित्रपटांपर्यंत पोहोचला आणि दाक्षिणात्य व हिंदी चित्रपटांत काम करत तिने प्रेक्षकांची पसंती मिळवली. सध्या ती तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे.
मृणाल लवकरच Dacoit या आगामी दाक्षिणात्य चित्रपटातून झळकणार आहे. येत्या १० एप्रिलला हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त मृणालने नुकतीच रणवीर अलाहाबादियाला मुलाखत दिली आहे. यामध्ये तिने मनोरंजनविश्वातील तिच्या आतापर्यंतच्या प्रवासाद्दल आणि भविष्यात आईपण अनुभवणं याबद्दल सांगितलं आहे. यावेळी तिने बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षितचं उदाहरण दिलं आहे. मृणाल नेमकं काय म्हणाली याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
माधुरी दीक्षितबद्दल काय म्हणाली मृणाल ठाकूर?
मुलाखतीत तुला मुलं हवी आहेत का? असं तिला विचारलं असता ती म्हणाली, “हो सगळ्यांना हवी असतात. मला मुलं हवी आहेत. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मी हा निर्णय घेईन.” पुढे तिला योग्य वेळ म्हणजे यासाठी तुझे काही निकष आहेत का? असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “मी यासाठी तयार आहे पण, माझं करिअरच्यादृष्टीने काय ध्येय आहे यावर अवलंबून आहे. मला माधुरी मॅमने ज्याप्रकारे समतोल साधला आहे ते खूप आवडतं. ती खूप हुशार आणि सुंदर अभिनेत्री आहे. तिने व्यावसायिक आणि खासगी आयुष्यात खूप उत्तमरित्या समतोल साधला आहे. तिने दोन गोंडस मुलांचं संगोपणही केलं आणि पुन्हा काम करायला सुरुवात केली आणि ती खूप छान काम करत आहे.” मृणाल अनेकदा तिच्या खासगी आयुष्याबद्दल आणि भविष्यातील प्लॅनिंगबद्दल मोकळेपणाने बोलत असते. ती लग्न करण्याबद्दल आणि आईपण या विषयावर पूर्वीसुद्धा बोलली आहे.
दरम्यान, मृणाल ठाकूर Dacoit या चित्रपटात दुहेरी भूमिकेतून झळकणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त एका कार्यक्रमात तिने याबद्दल सांगितलं आहे. हिंदीतही हा चित्रपट रिलीज होत आहे. तिच्याबरोबर यामध्ये Adivi Sesh हा अभिनेता मुख्य भूमिकेत झळकणार आहे. Dacoit या चित्रपटात प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. यामध्ये लोकप्रिय दिग्दर्शक व अभिनेता अनुराग कश्यपसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेतून झळकणार आहे.
दरम्यान, मृणाल ठाकूर शेवटची संजय लीला भन्साळी यांची निर्मिती असलेल्या ‘दो दिवाने सहर मै’मध्ये या चित्रपटात झळकलेली. अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी यामध्ये तिच्याबरोबर मुख्य भूमिकेत होता. आता अभिनेत्री एका नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
