अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि धनुष यांच्या लग्नाच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या. याच दरम्यान, मृणालने तिच्या आगामी ‘दो दिवाने शहर में’ या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी नात्यांमधील इनसिक्युरिटी म्हणजेच असुरक्षितता या विषयावर तिने तिचं मत व्यक्त केलं. तसेच मृणालने तिच्या एका जुन्या नात्यातील मजेशीर पण गंभीर किस्सा सांगितला.

हृतिकसारखं दिसण्यासाठी बॉयफ्रेंडने घटवलं १५ किलो वजन

मृणाल हृतिक रोशनबरोबर ‘सुपर ३०’ चित्रपटाचे शूटिंग करत होती, तेव्हा ती रिलेशनशिपमध्ये होती. तिचा बॉयफ्रेंड परदेशी होता, तो इनसिक्योर झाला होता. रौनक रजनीच्या युट्यूब चॅनेलवर बोलताना मृणाल म्हणाली, “त्याला वाटलं की मी हृतिक रोशनसारख्या खूप देखण्या हिरोबरोबर काम करतेय आणि त्याच्याबरोबर वेळ घालवतेय. त्यामुळे त्याने स्वतःहून वर्कआऊट सुरू केले आणि चक्क १५-१७ किलो वजन कमी करून बॉडी बनवली. नंतर काही काळाने त्याने व्यायाम करणं सोडून दिलं. तो खूप खाऊ लागला आणि त्याचं वजन २० किलोने वाढलं. जेव्हा मी त्याला विचारलं की हे काय सुरू आहे? तेव्हा तो म्हणाला, ‘मी त्याच्यासारखं दिसण्यासाठी हे सगळं करून आता थकलो आहे.'”

मृणाल ठाकूर पुढे म्हणाली, “मी त्याला कधीच वजन कमी करायला सांगितले नव्हतं, पण हृतिकसारख्या देखण्या हिरोबरोबर काम करतेय, या विचाराने त्याच्या मनात असुरक्षितता निर्माण झाली होती.”

Award Banner

दरम्यान, मृणालने तिच्याबद्दल अलीकडेच पसरलेल्या अफवांवर प्रतिक्रिया दिली. मृणालचं नाव दाक्षिणात्य अभिनेता धनुषशी जोडलं गेलं. इतकंच नाही तर तिच्या व धनुषच्या लग्नाचा दावा करणारा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. या व्हिडीओत बरेच सेलिब्रिटी असल्याचंही दाखवण्यात आलं होतं. हे सगळं भयंकर असल्याचं मृणालने म्हटलं.

व्हॅलेंटाईन डे आता ‘एप्रिल फूल डे’ झालाय; मृणालने स्पष्टच सांगितलं

‘गलाट्टा प्लस’शी बोलताना मृणाल म्हणाली, “मला वाटतं १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे असतो, तो आता १ एप्रिल म्हणजे एप्रिल फूल डे झाला आहे. कारण हे कोणी सुरू केलं मला माहित नाही. माझ्या नावाने काही खोट्या गोष्टी छापल्या जात आहेत, ज्याबद्दल मी कधीच बोलले नाही.”

गेल्या महिन्यात मृणाल आणि धनुष यांचे लग्न झाल्याचा एक AI निर्मित व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्याबद्दल ती म्हणाली, “हे खूप भीतीदायक आहे. फक्त व्ह्यूज मिळवण्यासाठी लोक अशा गोष्टी करत आहेत.” धनुषने मृणालच्या सन ऑफ सरदार २ च्या स्क्रीनिंगला हजेरी लावली होती, तेव्हापासून तिच्या व धनुषबद्दल या अफवा पसरल्या होत्या.