Mrunal Thakur Marriage Plans: मृणाल ठाकूर आणि सिद्धांत चतुर्वेदी सध्या त्यांच्या ‘दो दिवाने शहर में’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. त्यांचा चित्रपट आज (२० फेब्रुवारी) चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मृणाल आणि सिद्धांत यांनी लग्न आणि त्यासोबत येणाऱ्या कौटुंबिक दबावाबद्दल प्रतिक्रिया दिली.

मृणाल ठाकूर ३३ वर्षांची आहे. ती सध्या सिंगल आहे. ‘शोशा इंडिया’शी बोलताना मृणालने सांगितलं की तिच्या घरी आता रोजच लग्नाचा विषय निघतो. “आई-वडिलांच्या मनात त्यांच्या मुलांच्या लग्नाचे सनई-चौघडे नेहमीच वाजत असतात,” असं मृणाल म्हणाली.

“काल रात्रीच माझे बाबा मला म्हणाले, ‘आता तू सेटल व्हायला पाहिजे.’ त्यावर मी म्हटलं, ‘तुम्ही तुमच्या बहिणीला फोन करून तुमच्या मुलीसाठी एखादा चांगला मुलगा आहे का? असं का विचारत नाही.’ त्यांनी मलाच विचारलं, ‘कुठे आहे मुलगा?’ आणि मी उत्तर दिलं, ‘हेच तर मला विचारायचंय – मुलगा कुठे आहे?’ जर तुम्हीच मला हा प्रश्न विचारत असाल, तर मी काय सांगणार?” असं मृणाल ठाकूर म्हणाली.

मृणाल ठाकूरला अरेंज मॅरेजची भीती वाटत नाही

मृणाल ठाकूरने अरेंज मॅरेजबद्दल मोठं विधान केलं. तिला अरेंज मॅरेज म्हणजेच कुटुंबाने ठरवलेल्या लग्नाची अजिबात भीती वाटत नाही. ती हसत म्हणाली, “मला अरेंज मॅरेजची अजिबात भीती वाटत नाही. पण सध्या माझ्यासाठी कोणतंच स्थळ आलेलं नाहीये.”

अरेंज मॅरेजची संकल्पना काळाप्रमाणे कशी बदलली आहे, यावरही मृणालने आपलं मत मांडलं. ती म्हणाली, “एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्न फक्त करायचं म्हणून लग्न करू नये. पूर्वी अरेंज मॅरेज म्हणजे पालकांनी तुमची कोणाशी तरी ओळख करून देणं असायचं. आता मित्र-मैत्रिणी सुद्धा एकमेकांची ओळख करून देतात, ते देखील एक प्रकारचं अरेंज मॅरेजच आहे. पण शेवटी प्रेमविवाह असो वा अरेंज मॅरेज, सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोन व्यक्तींमध्ये संवाद व्हायला हवा आणि त्यांचे विचार पटले पाहिजेत.”

मृणालच्या मते लग्न करणाऱ्या दोघांचे एकमेकांशी विचार पटणं खूप गरजेचं आहे, पण त्याचबरोबर कुटुंबांची संमतीही महत्त्वाची आहे. कारण लग्न हे फक्त एका स्त्री आणि पुरुषाचं नसते, तर ते दोन कुटुंबांमधील नातं असते. जर सर्वांची संमती असेल, तर लग्नाला काय हरकत आहे? असं मृणाल म्हणाली.

लग्नाबद्दल सिद्धांत चतुर्वेदी काय म्हणाला?

सिद्धांत चतुर्वेदीने लग्नाबद्दलच्या त्याच्या घरच्यांच्या अपेक्षांबद्दल सांगितलं. त्यावर मृणाल मस्करीत म्हणाली, “त्याच्या आईला तर नातवंडं हवी आहेत. त्या म्हणतात, ‘तुम्ही सगळे कामावर जा, मला फक्त खेळायला नातवंडं हवी आहेत.'” यावर गमतीत सिद्धांत म्हणाला, “मी त्यांना तेच सांगतो, त्यासाठी मला लग्न करण्याची काय गरज आहे?”

“माझा लग्नाच्या पारंपरिक पद्धतीवर विश्वास आहे. माझ्या मते लग्न हे दोन कुटुंबांचे मिलन आहे. त्यामुळे लग्न ते योग्य पद्धतीने होणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला तुमचं संपूर्ण आयुष्य कोणासोबत तरी घालवायचं असतं. त्यासाठी एकमेकांना समजून घेणं, पारखणं आणि योग्य निर्णय घेणं महत्त्वाचे आहे. घाई करण्याची काहीच गरज नाही. फक्त करायचे म्हणून लग्न करू नये,” असा सल्ला सिद्धांत चतुर्वेदीने दिला.