Mrunal Thakur Wants To Work With Aditya Dhar : मृणाल ठाकूर बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांत काम केलं आहे. सध्या ती तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. मृणाल अनेकदा तिची मतं व प्रतिक्रिया ठामपणे मांडत असते. अशातच आता तिनं तिला काम मागण्यात कमीपणा वाटत नाही, असं म्हटलं आहे.
मृणाल जवळपास गेली १५ वर्षं इंडस्ट्रीत काम करत आहे. त्यामुळे आता दिग्दर्शकांना तिचं नाव परिचयाचं झालं आहे. परंतु, तिचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. तिनं आऊटसायडर म्हणून इंडस्ट्रीत पदार्पण केलं; पण आता ती आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या ती तिच्या ‘दो दिवाने सेहेर में’ या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. त्यानिमित्त तिनं अलीकडे अनेक मुलाखती दिल्या आहेत. मृणाल नेमकं काय म्हणाली त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
मृणाल ठाकूरची प्रतिक्रिया
‘न्यूज १८’शी संवाद साधताना मृणाल म्हणाली, “मॉम हा चित्रपट पाहिल्यानंतर मी रवी सरांना सांगितलं की, मला तुमच्याबरोबर काम करायचं आहे.” श्रीदेवीची मुख्य भूमिका असलेल्या ‘मॉम’ चित्रपटाचं दिग्दर्शन रवी उदयवार यांनी केलं होतं. मृणालच्या ‘दो दिवाने सेहेर में’ या चित्रपटाचं दिग्दर्शनही त्यांनीच केलं आहे. त्यामुळे मृणालची ही इच्छा पूर्ण झाली आहे.
‘दो दिवाने सेहेर में’ या चित्रपटाची निर्मिती संजय लीला भन्साळी यांनी केली असून, मृणालनं रवी यांच्या या चित्रपटासाठी तिनं स्वत: त्यांना विचारल्याचं म्हटलं आहे. मृणाल म्हणाली, “मी त्यांना सांगितलं की, मला तुमच्याबरोबर काम करायचं आहे. म्हणून मी त्यांना सर आपण चित्रपट कधी करत आहोत, असं विचारलेलं. त्याबद्दल मला खूप स्पष्टता आहे आणि असं केल्यानंच मला रवीसरांबरोबर चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. मला असं वाटतं की, माझ्यामध्ये हिंमत होती म्हणून मी इथे पोहोचली आहे.” यावेळी तिनं तिला आदित्य धरबरोबरही काम करायचं आहे, असं म्हटलं आहे.
मृणाल म्हणाली, “मला सहजासहजी संधी मिळालेल्या नाहीत. मला त्या स्वत:साठी शोधाव्या लागल्या. मला दिग्दर्शकांकडे जाऊन सर मी आहे. कधी ना कधी मला कास्ट करा, असं बोलण्यात लाज वाटत नाही. उलट आदित्य धर हा पहिला दिग्दर्शक होता, ज्याला मी कामासाठी विचारलेलं. ‘धुरंधर’ रीलीज झाल्यानंतर माझं त्याच्याशी बोलणं झालेलं. मी त्याला म्हटलेलं की, मी तो दिवस कधीच विसरू शकत नाही. मला कामासाठी कसं विचारायचं आणि त्यासाठी कोणाशी संपर्क साधायचा याबद्दल माहीत नव्हतं.”
मृणाल पुढे म्हणाली, “जर मी कोणाची तरी फॅन आहे, तर मला त्या व्यक्तीला तसं सांगावं लागणार. मी जरी त्यांना प्रत्यक्षात ओळखत नसले तरी मी त्यांचा नंबर शोधून किंवा इन्स्टाग्रामवर त्यांना मेसेज करते. एक कलाकार म्हणून प्रत्येकाला असं वाटतं की, त्याच्या कामाचं कौतुक व्हावं आणि त्याला काहीतरी वेगळं करणाऱ्या लोकांसह काम करण्याची संधी मिळावी. जेव्हा त्यांना कळतं की, तुम्ही कामासाठी भुकेले आहात तेव्हा ते तुमचा विचार करतात.”

