Mrunal Thakur Speaking Ahirani : आपल्या बोलीभाषेत संवाद साधण्याची जी गंमत आहे, ती गंमत आणखी कशातच नाही. त्यात जर आपलीच बोलीभाषा बोलणाराच भेटला, तर मग तो आनंद काही औरच असतो. असाच काहीसा आनंद बॉलीवूड अभिनेत्री मृणाल ठाकूरने अनुभवला. अभिनेत्री तिच्या अहिराणी बोलीभाषेत बोलल्याचा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे आणि तिला अहिराणी बोलताना पाहून चाहत्यांनीसुद्धा आनंद व्यक्त केलाय.
मृणाल ठाकूरने बॉलीवूड आणि साऊथ इंडस्ट्रीमध्ये काम करीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. दोन्ही फिल्म इंडस्ट्री तिने चांगल्याच गाजवल्या आहेत; पण मूळची मराठी असलेली मृणाल ठाकूर आपली मराठी मातीतील अहिराणी भाषा मात्र विसरलेली नाही. नुकत्याच एका कार्यक्रमात मृणाल अहिराणी बोलताना दिसली आहे आणि तिचा हा अहिराणी भाषा बोलतानाचा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होतो आहे.
मृणाल आणि सिद्धांत चतुर्वेदी यांचा ‘दो दिवाने सहर मै’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाच्या एका कार्यक्रमासाठी आलेल्या एका रिपोर्टरने मृणालशी अहिराणी भाषेत संवाद साधला. यावेळी रिपोर्टरने अहिराणी भाषेत अभिनेत्रीशी संवाद साधत “तुले सर्वांत जास्त काय आवडस? वांग्यानं भरीत, बट्टी गोटी, वांग्यानं भाजी की शेव भाजी?” असं विचारलं. हे ऐकताच मृणालला हसू आवरलं नाही.
मृणालने हसत-हसत उत्तर दिले, “काय बोली रायनी. अडीच वाजीगयना, जेवायना शे मले.” मग रिपोर्टरने तिला ‘काय खायला आवडेल’, असं विचारलं. त्यावर मृणाल म्हणाली, “पहिले वांग्यानं भरीत. वरण, एखादं बट्ट जोडे.”
पुढे मृणालने त्या रिपोर्टरला विचारलं, “वरण बट्टी लायेल शे ना तू?” मग ती रिपोर्टर म्हणते, “मी आता आणलं नाहीय; पण तू माझ्याबरोबर चल मी तुला खायला देते”. त्यावर मृणाल म्हणते, “चल, येस मी… वरण बट्टी, तूप आणि लिंबूशिवाय नाही होणार हां…”
मृणालने तिच्या अहिराणी भाषेतल्या उत्तराने सर्वच उपस्थितांना चकीत करून सोडले. ती अहिराणी बोलत असताना सिद्धांतदेखील आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहत होता. तिच्या या अहिराणीतल्या संवादाची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे.
दरम्यान, ‘दो दिवाने सहर मै’ या सिनेमात मृणाल ठाकूर आणि सिद्धांत चतुर्वेदी यांची रोमँटिक जोडी पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा २० फेब्रुवारी २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

