Mrunal Thakur in Pune: अभिनेत्री मृणाल ठाकूरने तिचा अभिनय क्षेत्रातील प्रवास हा टेलिव्हिजनवरून सुरू केला होता. कुमकुम भाग्य या मालिकेतील तिची भूमिकेने लक्ष वेधले होते. या मालिकेत तिने बुलबुल ही भूमिका साकारली होती. सहाय्यक भूमिकेतूनही तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते.

आता अभिनेत्री बॉलीवूडसह अनेक दाक्षिणात्य चित्रपटांत काम करत आहे. नुकतीच अभिनेत्री दो दीवाणे एक शहर में या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ओ सोनिया चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. २०१८ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.

२०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या सीता रामम या सिनेमातून मृणाल ठाकूरला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. देशभरातून तिच्या भूमिकेवर कौतुकाचा वर्षाव केला. सिनेसृष्टीत तिची वेगळी ओळख निर्माण केली. हाय पापा, सुपर ३०, जर्सी, गुमराह, लस्ट स्टोरीज २ अशा अनेक चित्रपटांतून तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

तिने विट्टी दांडू आणि सुराज्य या मराठी सिनेमांमध्येदेखील काम केले आहे. मराठमोळी मृणाल अनेकदा मराठीमधून व्हिडीओ शेअर करते. काही दिवसांपूर्वी तिने अहिराणीमध्ये बोलत सर्वांचे लक्ष वेधले होते. चाहत्यांनी अहिराणी ऐकून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता.

मृणाल ठाकूरने पुण्यात आल्यानंतर काय केले?

आता अभिनेत्रीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पुण्यातील आहेत. अभिनेत्री नुकतीच पुण्यात आली होती. पुण्यात आल्यानंतर तिने दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले.

फोटोमध्ये अभिनेत्री पारंपारिक वेशभूषेत दिसत आहे. तिने मंदिरात फोटो काढले आहेत. हे फोटो शेअर करताना अभिनेत्रीने “पुण्यात आलो आणि बाप्पाचं दर्शन घेतलं नाही तर काय केलं?”, अशी कॅप्शन दिली आहे. मृणालच्या या फोटोवर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करत प्रेम व्यक्त केले आहे.

मृणाल खानदेशातील आहे. तिचा जन्म धुळ्यातील एका मराठी कुटुंबात झाला. सध्या ती मराठी, हिंदीसह दाक्षिणात्य चित्रपटातही प्रमुख भूमिकेत दिसते. दरम्यान, अभिनेत्री सोशल मीडियावरही सक्रिय असते. विविध फोटो, व्हिडीओ ती शेअर करते. अनेकदा कुटुंबाबरोबरचे तिचे फोटो, व्हिडीओ लक्ष वेधून घेतात. दरम्यान, आगामी काळात अभिनेत्री कोणत्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.