Mrunal Thakur On Son of Sardaar 2: अभिनेत्री मृणाल ठाकूर तिच्या नवीन सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकताच तिचा डकैत हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन शेनिल देव यांनी केले आहे. मृणालबरोबर या सिनेमात आदिवी शेष, अनुराग कश्यप, प्रकाश राज आणि अतुल कुलकर्णी हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.
२०२५ मध्ये ती एका सिनेमात दिसली होती. ‘सन ऑफ सरदार २’ असे या सिनेमाचे नाव आहे. आता अभिनेत्रीने एका मुलाखतीत या सिनेमातील भूमिकेबद्दल वक्तव्य केले आहे.
मृणाल ठाकूरने नुकतीच प्रेमा द जर्नलिस्ट या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, “मला माहित नव्हते की एक ज्येष्ठ अभिनेता माझ्या नवऱ्याची भूमिका साकारणार आहे. माझी जशी अपेक्षा होती, तसा हा चित्रपट नव्हता. त्यामुळे तिथे मी चुकले. कारण माझा थोडासा विश्वास हलला होता.” सन ऑफ सरदार २ मध्ये ६६ वर्षीय चंकी पांडेंनी ३३ वर्षीय मृणालच्या पतीची भूमिका साकारली होती.
“मला यश, अपयशाचा…”
या मुलाखतीत मृणालने निराशा व्यक्त केली असली, तरी ही चूक चित्रपटाची नसून स्वतःचीच जास्त असल्याचे तिने मान्य केलं. तसेच ही भूमिका साकारल्याबद्दल तिला कोणताही पश्चाताप नाही, असेही ती म्हणाली. सन ऑफ सरदार २ ची टीम ही कुटुंब असल्याचे तिने म्हटले. ती म्हणाली, “या सगळ्यातून शिकायला मिळते. मला यश, अपयशाचा सामना करावा लागेल. फक्त स्क्रिप्ट वाचल्यानंतर सिनेमा ३०० कोटींचा टप्पा पार करणार आहे, हे समजले असते तर सगळ्याच कलाकारांनी ब्लॉकबस्टर चित्रपटांत काम केले असते.” तसेच, मृणाल असेही म्हणाली की चित्रपटातील काही चांगले सीनही दाखवले नाहीत.
सन ऑफ सरदार २ च्या कमाईबाबत बोलायचे तर सिनेमाने जगभरात ६६ कोटी रुपयांची कमाई केली होती. याचदरम्यान, मोहित सुरी दिग्दर्शित सैयारा हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने ५८० कोटींची कमाई केली होती. सैयाराचा परिणाम सन ऑफ सरदार २ च्या कमाईवर झाल्याचे म्हटले गेले.
सन ऑफ सरदार २ मध्ये अजय देवगणदेखील प्रमुख भूमिकेत दिसला होता. २०१२ ला प्रदर्शित झालेल्या सन ऑफ सरदार सिनेमाचा हा सीक्वेल होता.
दरम्यान, लवकरच, मृणाल ठाकूर आणखी एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘है जवानी तो इश्क होना है’ असे सिनेमाचे नाव आहे. हा रोमँटिक कॉमेडी सिनेमा असणार आहे. या सिनेमात मृणाल ठाकूरसह वरूण धवन प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. डेव्हिड धवन यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.
