Mrunal Thakur Viral Video: अभिनेत्री मृणाल ठाकूरने तिच्या अभिनयाची सुरुवात टेलिव्हिजनपासून केली. ‘कुमकुम भाग्य’ या मालिकेतील बुलबुल हे तिचे पात्र चांगलेच गाजले. मृणालची या मालिकेतून ओळख निर्माण झाली. मात्र, त्यानंतर तिने टेलिव्हिजनपुरते मर्यादित न राहता बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.

२०१८ ला प्रदर्शित झालेल्या ‘लव्ह सोनिया’ या सिनेमात तिने महत्त्वाच्या भूमिकेत काम केले. त्यानंतर तिने ‘धमाका’, ‘आँख मिचोली’, ‘तुफान’, ‘बाटला हाऊस’, ‘कल्की २८९८ एडी’, ‘घोस्ट स्टोरीज’, ‘सुपर ३०’, ‘दो दीवाने एक शहर में’, ‘जर्सी’, ‘गुमराह’, ‘द फॅमिली स्टार’, ‘सन ऑफ सरदार’, ‘हाय पापा’, ‘सन ऑफ सरदार २’, ‘है जवानी तो इश्क होना ही है’ अशा अनेक सिनेमांत काम केले आहे. २०२२ ला प्रदर्शित झालेल्या ‘सीता रामम’ या सिनेमातून मृणालला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. तिची भूमिका इतकी गाजली की तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला.

मृणाल ठाकूरचा डान्स व्हिडीओ होतोय व्हायरल

मृणाल ठाकूर सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती विविध फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. अनेकदा विनोदी रील्सही ती शेअर करताना दिसते. आता मृणाल एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. मृणालचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ तिच्या मैत्रिणीच्या लग्नातील आहे. यामध्ये ती डान्स करत असल्याचे पाहायला मिळत आहे. दिलजीत दोसांजच्या लव्हर या गाण्यावर ती तिची मैत्रीण विदुषीबरोबर डान्स करताना दिसत आहे. दोघींनीही सुंदर साड्या नेसल्या असून त्यांचा डान्स लक्ष वेधून घेत आहे. मृणालचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. तिच्या डान्सचे कौतुक करत आहेत. तसेच, अनेकांनी मृणालचा लाल रंगाच्या साडीमधील लूक छान दिसत असल्याचे म्हटले आहे.

मृणाल ठाकूरचा १ ऑगस्टला ३४ वा वाढदिवस झाला. त्यावेळी मृणाल ठाकूरच्या मैत्रिणीने हा व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर मृणालने स्वत: तिच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून चाहते त्यावर कमेंट्स करत कौतुक करत आहेत.

दरम्यान, मराठमोळ्या मृणाल ठाकूरने ‘विटी दांडू’, ‘सुराज्य’ अशा सिनेमांत प्रमुख भूमिकेत काम केले आहे.