Mukesh Khanna on Amitabh Bachchan: मुकेश खन्ना यांनी आजवर अनेक चित्रपट व टीव्ही शो यांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. शक्तीमान, भीष्म या त्यांच्या भूमिका चांगल्याच गाजल्या. मुकेश खन्ना हे त्यांच्या वक्तव्यामुळेदेखील अनेकदा चर्चेत येतात.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी आजवर लग्न का केले नाही, भविष्यात लग्न करण्याबद्दल त्यांचे काय विचार आहेत, याबद्दल वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते माझे ज्या स्त्रीबरोबर लग्न होणार आहे, ती कुठे ना कुठे आयुष्य जगत आहे. योग्य वेळ आली की आमची भेट होईल. तेव्हा आम्ही लग्न करू.

एका मुलाखतीत त्यांनी अमिताभ बच्चन यांच्याबद्दल वक्तव्य केले होते. ते बिग बींबद्दल नेमकं काय म्हणाले होते, हे जाणून घेऊ…

“लोक मला अमिताभ बच्चन यांची कॉपी…”

मुकेश खन्ना यांनी ‘बॉलीवूड ठिकाणा’ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत ते म्हणाले होते, “लोक मला अमिताभ बच्चन यांची कॉपी म्हणत असत, त्याचा मला त्रास होत असे. जेव्हा मी १९८१ मध्ये ‘रुही’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले, तेव्हापासूनच मला अमिताभ बच्चनची कॉपी असल्याचा टॅग मिळाला. त्यानंतर प्रदर्शित झालेल्या ‘दर्द-ए-दिल’ आणि ‘कॅप्टन बॅरी’ हे चित्रपट पाहिल्यानंतरदेखील हेच म्हटले गेले.”

ते असेही म्हणालेले, “एकदा मिथुन चक्रवर्ती यांना ‘गरिंबो का अमिताभ बच्चन म्हटले गेले होते, त्यावर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली माहीत नाही, पण मी असतो तर ‘शांत बसा’ असे म्हटले असते. मला लोक म्हणत असत की तुम्ही अमितजींसारखे दिसता, तुम्ही त्यांना कॉपी करता. माझे चित्रपट ओळीने फ्लॉप ठरले, त्यामुळे लोकांनी मला तो टॅग दिला. इथे फक्त यशाचा बोलबाला होतो. जेव्हा ‘महाभारत’ प्रदर्शित झाले, तेव्हा कोणीही मला अमिताभ बच्चन यांची कॉपी असल्याचा टॅग दिला नाही. माझ्या करिअरच्या प्रवासात हे माझ्याबरोबर अनेकदा घडले आहे. मला आठवते, अमिताभ बच्चन यांच्याशी बरेच साम्य असल्यामुळे माझ्या कारकिर्दीला उतरती कळा लागली अशा अर्थाचे अनेक आर्टिकल तेव्हा येत असत.”

अमिताभ बच्चन यांनी तुम्ही त्यांची कॉपी करता असे म्हटले होते का? यावर बोलताना मुकेश खन्नांनी होकार देत सांगितले, “अमितजींनी तसे म्हटले होते, पण मी त्यामुळे फ्लॉh ठरलो का? अमितजी माझ्या करिअरला थांबवू शकत नाहीत. माझ्या एका मित्राने मला सांगितले होते, तो अमितजींबरोबर चित्रपट पाहत होता. जेव्हा जाहिरात आली आणि ती त्यांनी पाहिली तेव्हा त्यांनी म्हटले, हा माझी कॉपी करतो. अनेक वर्षांनंतर काही यूट्यूबर्सनी हे वाक्य वापरत लिहिले की अमितजींच्या एका वाक्याने माझे करिअर संपले.”

मुकेश खन्ना असेही म्हणालेले, “प्रत्येक अभिनेता इतर कोणत्यातरी अभिनेत्याकडून प्रेरणा घेत असतो. मनोज कुमार, राजेंद्र कुमार यांच्यावर दिलीप कुमार यांचा मोठा प्रभाव होता. दिलीप साहेब हे शाहरुख खानचेदेखील प्रेरणास्थान आहे. अमिताभ बच्चन यांच्या सुरुवातीच्या भूमिका प्रेरित होत्या आणि का असू नयेत. जेव्हा तुम्ही काहीतरी पाहता त्यातून काहीतरी शिकत असता, यामध्ये गैर काही नाही; पण जेव्हा तुम्ही तुमच्या चित्रपटात मिमिक्री करायला जाता तेव्हा तुमचा नाश होतो. पण मी हे केले नाही”, असे मुकेश खन्ना यांनी म्हटले आहे.