Mukesh Khanna on Ranbir Kapoor’s Ramayana: रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असलेल्या ‘रामायण’ या सिनेमाची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. आता या सगळ्यात सिनेमाचा मुकेश खन्ना यांनी रामायण सिनेमाबद्दल वक्तव्य केले आहे. ते नेमकं काय म्हणाले आहेत, याबद्दल जाणून घेऊ…

“ते देवाचे रुप आहेत, अवतार आहेत”

मुकेश खन्ना यांनी बॉलीवूड नाऊज(Bollywood Now’s) या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत ते म्हणाले की, इतकी वर्षे रामायण वाचल्यानंतर आणि रामलीला पाहिल्यानंतर माझ्या मनात जी श्रीरामांची प्रतिमा आहे, तशी ती सिनेमात दिसत नाही. हे सांगताना त्यांनी ट्रेलरमधील एका सीनचा उल्लेख केला, ज्यामध्ये श्रीराम (रणबीर कपूरने साकारलेली भूमिका) झाडावर चढून बाण सोडताना दिसतात.

मुकेश खन्ना म्हणाले, “श्रीरामांना धुरंधर बनवले आहे. पण, ते देवाचे रुप आहेत, अवतार आहेत. श्रीकृष्णसुद्धा देवाचा अवतार होते, पण ट्रेलरमध्ये ज्या पद्धतीचे फायटिंग सीन दाखवले आहेत, ते पाहिल्यानंतर असे वाटते की श्रीराम झाडावर चढून बाण सोडू शकत नाहीत. मी हे कधी पाहिले नाही. मी इतक्या वेळा रामायण वाचले आहे, रामलीला पाहिली आहे.”

पुढे ते म्हणाले, “प्रभू श्री राम हे सलमान खान, अमिताभ बच्चन, रजनीकांत वाटतात. श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम आहेत. हसतमुख असायचे. समुद्रालाही हात जोडून म्हणायचे की बाजूला हो, मला पुढे जायचे आहे.”

ज्येष्ठ अभिनेते असेही म्हणाले, “जर तुम्ही श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम या त्यांच्या प्रतिमेपेक्षा अॅक्शन हिरो म्हणून दाखवलं, त्यांना अर्नोल्ड श्वार्झनेगर (Arnold Schwarzenegger) किंवा क्लिंट ईस्टवुड (Clint Eastwood)सारखं दाखवत असाल तर मला असं वाटतं की प्रभू श्रीराम अशा पद्धतीने लढले नसतील. जर ते अशाच प्रकारे लढले असते, तर मग त्यांना वानरसेनेच्या मदतीची गरजच का लागली असती?”

याबरोबरच, मुकेश खन्ना यांनी सिनेमाच्या वीएफएक्सबद्दलही वक्तव्य केले. चित्रपट मोठ्या प्रमाणात व्हिज्युअल इफेक्ट्सवर अवलंबून आहे. हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरू शकतो. पण, भारतात तो भारतीय श्रद्धा आणि भावनांचा विचार करूनच बनवला पाहिजे. भारतीय फक्त त्यातील स्पेशल इफेक्ट्स पाहणार नाहीत, असे म्हणत त्यांनी त्यांचे मत व्यक्त केले.