Mukesh Khanna on Ranveer Singh: मुकेश खन्ना यांनी बॉलीवूडमधील अनेक सिनेमांत काम केले आहे. त्यांचे अनेक सिनेमे गाजले आहेत. जवाब, शक्तिमान, सौदागर असे त्यांचे अनेक सिनेमे गाजले. त्याबरोबरच त्यांनी काही टीव्ही मालिकांमध्येही काम केले. त्यामध्ये महाभारत, शक्तिमान अशा मालिकांचा समावेश आहे. या मालिकांतील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या.
मुकेश खन्ना काय म्हणाले?
विशेषत: ९० च्या दशकात शक्तिमान ही त्यांची भूमिका प्रचंड गाजली होती. ही गोष्ट मोठ्या पडद्यावर दाखविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. या चित्रपटात रणवीर सिंह ‘शक्तिमान’ची भूमिका साकारणार असल्याचे जवळपास ठरले होते. मात्र, मुकेश खन्ना यांनी रणवीर सिंहला विरोध केला.
मुकेश खन्नांच्या मते, शक्तिमान या व्यक्तिरेखेला योग्य न्याय देण्यासाठी एखाद्या नव्या चेहऱ्याची निवड होणे गरजेचे आहे. शाहरुख खान, रणवीर सिंह हे मोठे कलाकार आहेत. त्यांचे मोठे स्टारडम आहे. ते शक्तिमान या पात्राशी एकरूप होऊन, ती भूमिका साकारू शकणार नाहीत. या भूमिकेसाठी असा कलाकार हवा, जो प्रेक्षकांना ‘शक्तिमान’ म्हणूनच दिसेल.
आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मुकेश खन्ना यांनी यावर पुन्हा वक्तव्य केले आहे. सुभोजित घोष यांच्याशी त्यांनी संवाद साधला. ते शक्तिमान हा मुद्दा सोडत नसल्याने त्यांना बऱ्याचदा ट्रोल केले जाते. त्याबद्दल त्यांना विचारले गेले. त्यावर मुकेश खन्ना म्हणाले, “मी तो मुद्दा का सोडू? मी ‘शक्तिमान’ला बनवले आहे.”
“रणवीरचा चेहरा थोडा खोडकर…”
तसेच त्यांनी असेही सांगितले की, सोनी इंडियालाच नाही, तर सोनी इंटरनॅशनलासुद्धा यावर सिनेमा बनविण्याची बंदी घातली आहे. रणवीर सिंहबद्दल ते म्हणाले, “तो धुरंधर, खिलजी, गली बॉयमध्ये भूमिका साकारू शकतो; पण शक्तिमान ही भूमिका साकारू शकत नाही. ‘शक्तिमान’साठी मला वेगळ्या पद्धतीचा अभिनेता हवा आहे. रणवीरचा चेहरा थोडा खोडकर व आगाऊ वाटतो. शक्तिमान हा अतिशय सकारात्मक स्वभावाचा असायला हवा; पण तो वाईट अभिनेता आहे, असे मी कधीही म्हटलेले नाही.”
जेव्हा मुकेश खन्नांनी रणवीरला ‘शक्तिमान’साठी नाही म्हटलं, त्यावेळी त्याची काय प्रतिक्रिया होती? यावर मुकेश खन्ना म्हणाले, “मी त्याचं म्हणणं ऐकलं. त्याला ‘शक्तिमान’ची भूमिका साकारायची होती. तो जवळजवळ तीन तास तिथे बसला होता आणि मला पटवून देण्याचा खूप प्रयत्न करीत होता. त्याला नकार देताना मलाही अपराधीपणा वाटत होता. कारण- ‘शक्तिमान’साठी मला हवा असलेला चेहरा त्याच्यात दिसत नव्हता. जेव्हा मी त्याचं कौतुक केलं. तेव्हा लोकांना वाटलं की, मी त्याला शक्तिमानची भूमिका देणार आहे. पण, तसे मी कधीही म्हणालो नाही. तो चांगला अभिनेता आहे, मोठा अभिनेता आहे, त्याच्यात प्रचंड ऊर्जा आहे, त्याच्यात सगळे गुण आहेत. पण, त्याला मी शक्तिमानच्या भूमिकेची ऑफर देणार असल्याचे कधीही म्हणालो नाही. जेव्हा मी अल्लू अर्जुनचे कौतुक केले होते, त्यावेळी लोक तसेच म्हणाले होते. पण, मी त्यालाही शक्तिमानच्या भूमिकेची ऑफर दिली नाही. त्यामुळे लोकांनी माझं म्हणणं समजून घेण्याची गरज आहे.”
“कोट्यवधी रुपयांचे चेक नाकारले…”
मुकेश खन्ना असेही म्हणाले, “व्यावसायिकदृष्ट्या पाहिलं, तर मी मूर्खासारखे निर्णय घेत आहे. मी लाखो नाही, तर कोट्यवधी रुपयांचे चेक नाकारले आहेत. माझ्याच ऑफिसमधील लोकांनीही मला चेक घेण्याबद्दल सुचवले. नंतर तुम्ही यासाठी लढू शकता; पण मी त्यांना नाही, असे सांगितले. पैशांपेक्षा माझ्यासाठी तत्त्वं महत्त्वाची आहेत.”
त्यांनी पुढे, “मला ‘शक्तिमान’चा वारसा जपायचा आहे. व्यावसायिकदृष्ट्या पाहिलं, तर हा कदाचित खूप मूर्खपणाचा निर्णय वाटू शकतो. लोक मला म्हणतात की, पुढचा विचार करा. तो एवढा मोठा अभिनेता आहे, तो हे करू शकतो. कलाकार काहीही करू शकतात. अनेक जण मला म्हणतात की, तो ‘धुरंधर’ करू शकतो म्हणजे तो मोठा अभिनेता आहे. तो ‘शक्तिमान’ही करू शकतो. तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवत नाही? प्रेक्षकांना शक्तिमानबद्दल उत्सुकता आहे, याची मला जाणीव आहे”, या शब्दांत आपल्या म्हणण्याचे समर्थन केले.
