Mukesh Khanna on rejecting movies : अभिनेते मुकेश खन्ना हे मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेते असून त्यांच्या ‘शक्तिमान’ या मालिकेने एक काळ गाजवला आहे. ‘शक्तिमान’ने त्यांना घराघरांत ओळख मिळवून दिली असली तरी मागील काही वर्षांपासून ते मनोरंजन विश्वापासून लांब आहेत. मुकेश खन्ना यांनी जवळपास २५ सिनेमांच्या ऑफर नाकारल्या असून यामागे नेमके काय कारण आहे याचा खुलासा केला आहे.

मुकेश खन्ना हे लवकरच जिओ हॉटस्टारवरील गुजराती सिनेमा ‘विश्वगुरू’मध्ये झळकणार आहेत. यापूर्वी हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून लवकरच तो ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. याबाबत सांगताना मुकेश खन्ना यांनी सिनेमामध्ये काम न करण्याचे कारण सांगितले. ते म्हणाले, “मी फक्त माझ्या अटींवरच काम करतो, त्यामुळे अभिनयापासून थोडा लांब आहे.”

मुकेश खन्नांच्या सिनेमाबाबत ‘या’ तीन अटी

पुढे ते म्हणाले, “पहिली गोष्ट तर मी कोणाकडे काम मागायला जात नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी खूप निवडक भूमिका साकारतो. मला दहा कामांच्या ऑफर आल्या तर मी त्यातील फक्त एक ते दोन काम स्वीकारतो. ‘महाभारत’नंतर मी ‘सौगंध’, ‘सौदागर’ आणि ‘तेहलका’ हे तीन चित्रपट केले. पण, मी २५ चित्रपटांना नकार दिला होता. आताही कामासाठी माझ्या काही अटी आहेत. मी खलनायकाची भूमिका करणार नाही, दाढी वाढवणार नाही आणि रोमँटिक भूमिकाही करणार नाही.”

मुकेश खन्नांनी ‘या’ सिनेमात केलंय काम

दरम्यान, मुकेश खन्ना हे त्यांच्या सिनेमांपेक्षा त्यांच्या वक्तव्यांमुळे जास्त चर्चेत असतात. मुकेश खन्ना यांनी १९८१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रुही’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर ‘वक्त का शहजादा’, ‘दर्द-ए-दिल’, ‘कॅप्टन बेरी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये ते झळकले. बॉलीवूडबरोबरच त्यांनी टीव्ही मालिकांमध्ये प्रचंड ओळख मिळवली. ‘शक्तिमान’ व ‘महाभारत’ या मालिकांसह त्यांनी ‘चंद्रकांता’, ‘द ग्रेट मराठा’, ‘युग’ आणि ‘प्यार का दर्द है मीठा-मीठा प्यारा-प्यारा’ यांसारख्या मालिकांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या. मुकेश खन्ना हे फक्त त्यांच्या सिनेमांमुळेच नाही तर त्यांच्या वक्तव्यांमुळेही चर्चेत असतात.