Mukesh Khanna Samay Raina Ad Controversy: समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या पहिल्या सीझनमध्ये वादग्रस्त वक्तव्ये केल्यामुळे समयवर सर्वांनी राग व्यक्त केला होता. त्यामध्ये ‘शक्तिमान’फेम अभिनेते मुकेश खन्ना यांनीसुद्धा संतप्त प्रतिक्रिया दिली होती. समयला ‘गाढवावर बसवून फिरवलं पाहिजे’, असा आक्रमक पवित्रा घेणाऱ्या मुकेश खन्नांनी आता त्याच्याबरोबर एका जाहिरातीमध्ये काम केले आहे. त्यावरून सोशल मीडियावर चर्चा रंगलेली असताना मुकेश यांनी टीकेवर उत्तर दिले आहे.
सुभोजित घोष यांच्या पॉडकास्टमध्ये मुकेश खन्ना यांनी समय रैनाबरोबर काम केल्याचा अनुभव सांगितला. तसेच त्यावरून टीका करणाऱ्यांना उत्तर दिले. मुकेश खन्ना म्हणाले, “समय रैनाबरोबर मी जी जाहिरात केली, त्याचा ‘इंडियाज गॉट लेटंट’शी काहीही संबंधित नाही. हा फक्त एका मोबाईलच्या जाहिरातीचा प्रोजेक्ट होता. ही जाहिरात मी करावी म्हणून त्या कंपनीने माझी १० दिवस समजूत काढली आणि समय व त्याच्या टीमनेही ही जाहिरात करण्यासाठी मला विनंती केली होती.”
मी माझ्या भूमिकेवर आजही ठाम – मुकेश खन्ना
पण, तीव्र टीका केल्यानंतर एकत्र काम केल्यामुळे नेटकऱ्यांनी मुकेश खन्ना यांच्यावर नाराजी व्यक्त केली. त्यावर प्रतिक्रिया देताना मुकेश म्हणाले, “मी कधी समय रैनाचं कौतुक केलं आहे का? किंवा मी कधी त्याच्या शोला पाठिंबा दिला आहे का? मी त्याच्या त्या शोबाबत घेतलेल्या भूमिकेवर आजही ठाम आहे.
पुढे मुकेश खन्ना म्हणाले, “जे माझे चाहते आहेत, ते मी विकला गेलोय, असे कधीच म्हणणार नाहीत. जर त्यांनी मला विकत घेतले असते, तर मीसुद्धा शिवीगाळ केली असती ना? मी कुठे झुकलो आणि तो चांगला आहे, असे म्हणालो आहे? तो माझ्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करीत होता, तो खूप हुशार आहे; पण ‘शक्तिमान’ला विकत घेता येत नाही आणि मी त्याच्या शोमध्ये गेलोही नाही.”
पुढे मुकेश खन्ना यांनी समय रैनाची वैयक्तिक भेट आणि त्याचा विनोद हे दोन्ही वेगवेगळे आहेत, त्याच्या विनोदी कंटेंटबाबत आजही त्यांची मते वेगळी आहेत. तसेच समय हा खूप विनोदी असून, नवीन गोष्टी करण्यासाठी कायम प्रयत्न करीत असल्याचे मुकेश खन्ना म्हणाले आहेत. या जाहिरातीमुळे त्यांची भेट झाली असून, यावेळी त्याने खूप विनोद केल्याचे मुकेश खन्ना यांनी सांगितले.
दरम्यान, मुकेश खन्ना आणि समय रैना यांनी एकत्र शूट केलेली जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यावर काही नेटकऱ्यांनी समय रैनाची बाजू मांडली आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “समयला आता नवीन हेटर्सची (द्वेष करणाऱ्यांची) गरज आहे. कारण- जुने आता त्याचे क्लायंट झाले आहेत.” तर दुसऱ्या युजरने “सॉरी शक्तिमान,” असे म्हणत नाराजी व्यक्त केली.
