मुक्ता बर्वे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मराठी नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमात तिने काम केलं आहे. अभिनयासह तिने नाटकाची निर्मितीही केली आहे. मराठी इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत जे हिंदीतही काम करतात. मुक्ताने हिंदीत काम केलं आहे. अशातच आता तिने हिंदी कलाकृतींसाठी दिलेल्या ऑडिशनबद्दल सांगत तिने इतर कलाकारांच्या तुलनेत हिंदीत फार काम का केलं नाही यामागचं कारणही सांगितलं आहे.

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मुक्ताने समाजात काही घटना घडल्यानंतर लोकांच्या कलाकारांनी त्यावर व्यक्त व्हावं अशा असलेल्या अपेक्षा, हिंदी व मराठी कलाकृती, निर्मिती, नाटक आणि मुंबई पुणे मुंबई चित्रपटाचा चौथा भाग अशा विविध गोष्टींबद्दल भाष्य केलं आहे. याचवेळी तिने ती एकदा हिंदीकडे वळली होती आणि हिंदीत काम करण्याचा निर्णय घेतला होता असं म्हटलं आहे.

…म्हणून मुक्ताने हिंदीत फार काम केलं नाही

अमोल परचुरेला दिलेल्या मुलाखतीत तिला तू हिंदीत फार काम केलं नाही, त्यामागचं कारण काय असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “त्याचं कारण असं की जेव्हा मी काम सुरू केलं तेव्हा हिंदीची क्रेझ होती. हिंदी कलाकृतींचा प्रेक्षकवर्ग खूप मोठा आहे. पण आता सगळं बदललं आहे. आता केवळ हिंदी आहे म्हणून जास्त लोक बघतील असं नाहिये. चांगलं असेल तर कुठल्याही भाषेतील कलाकृती पाहतील. त्यामुळे चांगल्या भूमिका करणं याला माझं प्राधान्य आहे. मला नक्कीच आवडेल हिंदीतही काम करायला पण सुदैवाने असं होतं गेलं की मला मराठीत चांगली कामं मिळत गेली. मी नाटक, सिनेमा आणि मालिका अशा तिन्ही करत राहिले. त्यामुळे कधीतरी यातलं चांगलं आलं, कधी त्यातलं चांगलं असं झालं आणि २५ वर्षे धावपळ कमीच पडलीये.”

मुक्ता बर्वे पुढे म्हणाली, “त्यामुळे मुद्दाम मी निर्णय घेतला असं नाहीये. खरं सांगायचं तर कोविडच्या आधीचा काळ एक वर्ष खरं तर मी हिंदी ऑडिशन द्यायला सुरुवात केली होती आणि तेव्हा मी निर्णय घेतला होती की मी हिंदीत काम करणार आणि तेव्हाच देवी आम्ही शूट केली आणि ती रिलीज झाली. पण आर्थिक गोष्टींमुळे मी पुन्हा मराठीत काम करायला सुरवात केलं आणि मराठीत तिन्ही माध्यमात मला चांगली कामं मिळाली.”

ऑडिशनबद्दल मुक्ता पुढे म्हणाली, “मी जोरदार ऑडिश देत असते. पण अजून हवा तसा रोल मी मिळवू शकले नाहीये, पण मला घाई नाहीये. उद्या मराठीत ऑडिशन मागितलं तरी मी देईन.”