अभिनेत्री शेफाली जरीवालाचं शुक्रवारी, २७ जून रोजी निधन झालं. पोलीस सध्या तिच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करत आहेत. मुंबई पोलिसांना तिच्या अंधेरी येथील घरी काही औषधं सापडली आहेत. ४२ वर्षी शेफालीचा मृत्यू कशामुळे झाला असावा? याचा शोध पोलीस घेत आहेत.
हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, शेफालीच्या घरात सापडलेल्या औषधांमध्ये अँटी एजिंग मेडिसीन (तरुण दिसण्यासाठी घेण्यात येणारी औषधं) स्कीन ग्लो व व्हिटमिन्स टॅबलेट्सचा समावेश आहे. पोलीस पंचनाम्यातील माहितीनुसार, त्यांना ब्यूटी व सेल्फ केअर सप्लिमेंट्सचे दोन बॉक्स तिच्या घरात आढळले.
शेफाली डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या घेत नव्हती पण त्यामुळे तिच्या आरोग्यावर कोणताही परिणाम झाला नाही, असं तिच्या कुटुंबीयांनी सांगितलं. शेफालीला शुक्रवारी तिचा पती पराग त्यागी व इतर तीन जणांनी बेलेव्ह्यू मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलला नेलं होतं, पण रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचं निधन झालं होतं असं तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितलं. शेफालीचा मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्याने झाला, असं म्हटलं जात होतं; पण तिच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.
शेफालीचा रक्तदाब अचानक कमी झाला
आरएन कूपर रुग्णालयात शेफालीचे शवविच्छेदन करण्यात आले. तेथील डॉक्टरांना संशय आहे की रक्तदाब अचानक कमी झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला असावा.
परागने पोलिसांना काय सांगितलं?
शेफालीचा पती परागच्या म्हणण्यानुसार, घरी सत्यनारायणाची पूजा असल्याने शेफाली उपवास करत होती. निधनाच्या एक दिवस आधी जेवण केल्यानंतर ती कोसळली होती, असंही परागने पोलिसांना सांगितलं.
शेफालीच्या मृत्यूचे नेमके कारण पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच स्पष्ट होईल. पण शेफालीबरोबर कोणताही घातपात झाल्याची शक्यता मुंबई पोलिसांनी फेटाळून लावली आहे. सध्या पोलीस शेफालीच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करत आहेत.
दरम्यान, शुक्रवारी निधन झाल्यावर शेफालीवर शनिवारी ओशिवारा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर रविवारी जुहू बीचवर पराग व शेफालीच्या कुटुंबियांनी तिचे अस्थी विसर्जन केले. शेफालीच्या अस्थी घेतल्यावर परागला अश्रू अनावर झाले होते.