Amitabh Bachchan Jalsa House Flooded In Mumbai Rains: मुंबईत दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असून, शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. आता या सगळ्यात अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील ‘जलसा’ बंगल्याबाहेरील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओंमध्ये पावसाचे पाणी अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याच्या परिसरात शिरल्याचे पाहायला मिळत आहे. इतकेच नाही, तर ते पाणी तिथे साचल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर साचलं पाणी
अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेरील हे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. नेटकरी त्यावर मजेशीरपणे कमेंट्स करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. एकाने लिहिले, “पाण्याला माहीत नव्हते की, ते अमिताभ बच्चन यांचे घर आहे. नाही तर पाणी तिथे गेले नसते”, असे लिहीत पुढे हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत. दुसऱ्या एकाने लिहिले, “आता आम्हाला बरे वाटत आहे.” तर अनेकांनी सगळीकडेच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असे लिहिले आहे.
अमिताभ बच्चन यांनी मात्र घराबाहेर पाणी साचल्याप्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी त्यांच्या ब्लॉग पोस्टमध्ये फिफा वर्ल्ड कपबद्दल लिहिले. त्यांनी लिहिले, “भारतात फिफा वर्ल्ड कपचे सामने खूप उशिरा पाहावे लागतात. पण खरे चाहते झोपेचा त्याग करून सामने पाहतात आणि मीही त्याला अपवाद नाही. या विश्वचषकातील सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे जे संघ विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते, ते हळूहळू स्पर्धेबाहेर पडत आहेत आणि कमी प्रसिद्ध असलेले संघ आत्मविश्वासाने पुढे जात आहेत. हे पाहणे खरोखरच आनंददायी आहे. ज्यांना कमी लेखले गेले, अपमानित केले गेले, दुर्लक्षित केले गेले, तेच पुन्हा उभे राहून यश मिळवतात आणि स्वतःला सिद्ध करतात, हीच खरी जिद्द असते. मात्र, ज्यांनी तुमचा अपमान केला त्यांना प्रत्युत्तर देण्यात नव्हे, तर नम्रतेने पुढे जाण्यातच खरे मोठेपण असते”, असे लिहीत त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
बिग बी सोशल मीडिया, तसेच त्यांच्या ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतात. विविध गोष्टींबद्दल ते त्यांची मते सांगतात. घडत असलेल्या गोष्टी, नवीन तंत्रज्ञान, नाती, जीवनशैली यांबद्दल ते त्यांना काय वाटते, ते काय विचार करतात, याबद्दल सांगत असतात. याबरोबरच अनेकदा सिनेमाच्या शूटिंगदरम्यान आलेले अनुभव, किस्से याबद्दलही ते वेळोवेळी सांगतात.
दरम्यान, अमिताभ बच्चन लवकरच ‘कल्की २८९८ एडी २’मधूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
