Mumtaz on Shammi Kapoor: ७० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून मुमताज यांची ओळख होती. तेरे मेरे सपने, रोटी असे त्यांचे अनेक चित्रपट लोकप्रिय ठरले होते. मात्र, यशाच्या शिखरावर असताना मुमताज यांनी एक असा निर्णय घेतला, ज्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटले होते.
१९७४ मध्ये उद्योजक मयूर माधवानी यांच्याशी लग्न केल्यानंतर त्यांनी चित्रपटांत काम न करण्याचा निर्णय घेतला. मुमताज यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी हा निर्णय का घेतला होता, यावर वक्तव्य केले आहे.
“४०-५० वर्षे होईपर्यंत…”
मुमताज यांनी नुकतीच संदीप कोचर यांना मुलाखत दिली. या मुलाखतीत त्या म्हणाल्या, “माझा जन्म एका पारंपारिक इराणी कुटुंबात झाला. माझ्या वडिलांना वाटायचे की मुलीने एका ठराविक वयात लग्न केले पाहिजे. ४०-५० वर्षे होईपर्यंत फक्त कामच करत राहू नये. माझी आई आणि घरातील सगळ्यांनाच माझे लग्न व्हावे असे वाटत होते. मी माझ्या नवऱ्याच्या कुटुंबाला लहानपणापासून ७-८ वर्षांची असल्यापासून ओळखत होते, कारण आम्ही शेजारी राहायचो. मी जर मयूरशी लग्न केले तर मी आनंदी राहीन, असे माझ्या आईला वाटत होते. त्यामुळे मी लग्न करण्याचा निर्णय घेतला.”
मुमताज असेही म्हणाल्या की, जेव्हा मयूर व माझे लग्न झाले. त्यावेळी ते भारतात राहत नव्हते. इंग्लंडमध्ये शिक्षण घेत होते. त्यांच्या कुटुंबाचा युगांडामध्ये व्यवयास होता. ते श्रीमंत होते.”
जरी कुटुंबाच्या इच्छेसाठी मुमताज यांनी लग्नासाठी होकार दिला असला तरी त्यांना आणखी काही वर्षे काम करण्याची इच्छा होती, असेही त्या म्हणाल्या. मुमताज म्हणाल्या की, माझे कुटुंब पारंपारि असल्याने त्यांच्या मतानुसार, मुलींनी विशिष्ट वयात लग्न केले पाहिजे. त्यामुळे मी त्यावेळी लग्न केले. माझ्याबरोबर लग्न करण्यासाठी मयूर यांनी दोन वर्षे वाट पाहिली. त्या दोन वर्षांच्या कालावधीत ज्या चित्रपटात काम करण्यासाठी मी मानधन घेतले होते, त्या चित्रपटांचे शूटिंग पूर्ण केले. काहींचे पैसे परत केले.
याच मुलाखतीत मुमताज शम्मी कपूर यांच्याबद्दलही बोलल्या. प्रेम असूनही त्यांच्याबरोबर काम लग्न केले नाही, यावर त्यांनी खुलासा केला. त्या म्हणाल्या, “त्यावेळी मी खूप लहान होते. मला शम्मी कपूर यांच्याबरोबर काम करण्यास काहीच अडचण नव्हती. मात्र, त्यावेळी कपूर कुटुंबाचे त्यांच्या सुनांसाठी काही नियम होते. पृथ्वीराज कपूर यांच्या नियमानुसार, घरातील सून लग्नानंतर काम करू शकणार नाही. गीता बालींनीदेखील लग्नानंतर काम थांबवले होते. जेव्हा त्यांनी सांगितलं की मी काम करू शकत नाही, तेव्हा मी विचार केला की मी अजून तरुण आहे आणि माझ्या काही महत्वाकांक्षा आहेत. मला काम करायचे आहे. त्यामुळे मी शम्मी कपूर यांच्याबरोबर लग्न करण्यास नकार दिला.”
दरम्यान, मुमताज सध्या त्यांच्या विविध मुलाखतींमधील वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असतात.
