Mumtaz opens up about her interfaith marriage with Mayur Madhvani : मुमताज यांनी १९५२ मध्ये बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली. मात्र, आघाडीची अभिनेत्री होण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. सुरुवातीच्या काळात त्यांना अनेकदा बी-ग्रेड चित्रपटांमध्ये काम मिळत होतं. पण १९६७ मध्ये दिलीप कुमार यांच्याबरोबर ‘राम और श्याम’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या करिअरला मोठं वळण मिळालं. त्यानंतर मुमताज त्या काळातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक बनल्या. मात्र, त्यांच्या स्टारडमचा काळ फार मोठा नव्हता.

१९६८ मध्ये शम्मी कपूर यांनी त्यांना लग्नाची मागणी घातल्याचं म्हटलं जातं. मात्र, लग्नानंतर अभिनय सोडावा अशी त्यांची अट होती. त्या वेळी करिअरच्या शिखरावर असलेल्या मुमताज यांनी प्रेमापेक्षा कामाची निवड केली. पण सहा वर्षांनी, १९७४ मध्ये त्यांनी वेगळा निर्णय घेतला. चित्रपटसृष्टी सोडून त्यांनी गुजराती उद्योजक मयुर माधवाणी यांच्याशी लग्न केलं आणि लंडनमध्ये स्थायिक झाल्या. त्यांचं आंतरधर्मीय लग्नही चर्चेत राहिलं. मात्र, मुमताज आणि त्यांच्या कुटुंबासाठी हा कधीच मुद्दा नव्हता. मुमताज यांनी विकी ललवाणीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. मुमताज त्यांच्या लग्नाबद्दल नेमकं काय म्हणाल्या सविस्तर जाणून घेऊयात…

आंतरधर्मीय लग्नाबद्दल मुमताज काय म्हणाल्या?

अभिनेत्री लग्नाबद्दल म्हणाल्या, “माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. माझी आई, आजी आणि मावशी यांनी या नात्याला होकार दिला होता. त्यांना हे कुटुंब माहिती होतं आणि त्यांनी मला अभिनय सोडून संसार करण्याचा सल्ला दिला.” 

त्या पुढे म्हणाल्या, “आमच्या कुटुंबात हिंदू-मुस्लीम भेदभावाला कधीच महत्त्व दिलं गेलं नाही. आम्ही कधी धर्मांमध्ये फरक मानला नाही. माझ्या बहिणीनेही हिंदू व्यक्तीशी लग्न केलं होतं – रणधावा जी यांच्याशी. आम्ही अशा गोष्टींवर कधीच विश्वास ठेवला नाही. माझं त्यांच्याशी लग्न होणं नशिबात होतं आणि मी कुटुंबाच्या सल्ल्यानुसार निर्णय घेतला. मी पारंपरिक कुटुंबातून आले आहे. इराणी लोक तसेच असतात.”

लग्नानंतर कधीच मांसाहार सोडण्यास सांगितलं नाही – मुमताज

मुमताज यांनी लग्नानंतरच्या आयुष्याबद्दलही सांगितलं की, त्यांना स्वतःच्या सवयी बदलण्याची कधीच गरज पडली नाही. असं म्हटलं आहे. त्या म्हणाल्या, “माधवानी कुटुंबाच्या संपत्तीबद्दल बढाई मारायची नाही, पण घरात अनेक स्वयंपाकी होते. शाकाहारी आणि मांसाहारी जेवणासाठी वेगळे स्वयंपाकी होते. मला कधीच मांसाहार सोडण्यास सांगितलं नाही. माझे पती शाकाहारी होते, पण त्यांनी मलासुद्धा शाकाहारी होण्यास कधीच सांगितलं नाही.”

त्यांनी फिरोझ खान यांच्याबरोबरच्या मैत्रीबद्दलही सांगितलं. या नात्यावर अनेकदा चर्चा होत असे. त्यावर स्पष्टीकरण देताना मुमताज म्हणाल्या, “फिरोज खान यांच्या लग्नाआधीपासून मी त्यांना ओळखत होते. त्यांची इंग्लंडमधील एक मैत्रीण होती. आम्ही खूप चांगले मित्र होतो आणि एकत्र कामही केलं. अशी एकही महिला नसेल जिला ते आकर्षक वाटले नसतील. ते खूप देखणे होते. आम्ही इराणी असल्यामुळे आमच्यात चांगला स्नेह होता, पण आमच्यात कधीच प्रेमसंबंध नव्हते.”

त्या पुढे म्हणाल्या, “आज माझ्या मुलीचं लग्न त्यांच्या कुटुंबात झालं आहे आणि त्यांना सुंदर मुलं आहेत. फिरोझ खान यांचा मुलगा व अभिनेता फरदीन खान याने २००५ मध्ये मुमताज यांची मुलगी नताशा माधवानी हिच्याशी लग्न केलं.