Mumtaz Reveals Akshay Kumars One Health Advice: अभिनेता अक्षय कुमार हा लवकरच ‘हाऊसफुल ५’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच ‘हेरा फेरी ३’ या चित्रपटामुळेदेखील तो सध्या चर्चेत आहे. अभिनेता जितका चित्रपटांसाठी ओळखला जातो, तितकाच तो त्याच्या फिटनेससाठीदेखील ओळखला जातो. आता ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज यांना त्याने एक सल्ला दिला, त्याबाबत त्यांनी खुलासा केला आहे.
बॉलीवूड अभिनेत्री मुमताज या गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी मुलाखतीत अनेक कलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. आता त्यांनी अक्षय कुमारने त्यांना फिटनेसबाबत काय सल्ला दिला होता, याबद्दल वक्तव्य केले आहे.
माझ्या चेहऱ्याची, केसांची…
७७ वर्षीय मुमताज यांनी रेडिओ नशा ऑफिशिअलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या फिटनेसबाबत वक्तव्य केले. मुमताज म्हणाल्या, “मी जेवणाबाबत नियम पाळते. मी जास्त खात नाही. मी चुकीच्या गोष्टी खात नाही. मी भरपूर व्यायाम करते, माझ्या चेहऱ्याची, केसांची काळजी घेते. चेहऱ्यावर लावण्यासाठी मी स्वत: मास्क तयार करते. योग्य वेळेत योग्य गोष्टी खाण्याला मी प्राधान्य देते.
मुमताज यांनी पुढे त्यांचा दिनक्रम कसा असतो यावर वक्तव्य केले. त्या म्हणाल्या, “मी दररोज रात्री ९-१० च्या दरम्यान झोपते आणि सकाळी ४-५ दरम्यान उठते. सकाळी ७ पर्यंत मी व्यायाम करते. त्यानंतर ब्लॅक कॉफीचे सेवन करते. त्यानंतर मी थोडासा नाश्ता करते. त्यानंतर दुपारचे जेवण करते. मी रात्री जेवत नाही. मी फक्त काही फळे खाते.”
रात्री न जेवण्याचा सल्ला अक्षय कुमारने दिल्याचा खुलासा करत मुमताज म्हणाल्या, “अक्षय कुमार एकदा मला म्हणाला होता. ५-६ वाजल्यानंतर काहीही खाऊ नका. ती गोष्ट मी त्याच्याकडून शिकते.”
अक्षय कुमारने एका जुन्या मुलाखतीत रात्री का जेवण करू नये, यावर वक्तव्य केले होते. अभिनेता म्हणालेला, “शास्त्रात लिहिले आहे की ६.३० नंतर जेवण करू नये. जर तुम्ही उशिरा १०-११च्या दरम्यान जेवण केलं, त्यानंतर तुम्ही झोपी जाता. पण, तुमची आतडी अन्न पचवण्याचा प्रयत्न करत जागी असतात, त्यामुळे तुमच्या शरीरावर त्याचा अतिरिक्त ताण येतो. अक्षय असेही म्हणाला होता की, जर त्याला त्या वेळेनंतर भूक लागली तर तो सूप किंवा सॅलेड खाण्याचा पर्याय निवडतो.
एकदा विवेक ओबेरॉयनेदेखील अक्षय कुमार त्याची दिनचर्या किती कडक शिस्तीने पाळतो, याचा किस्सा सांगितला होता. जेव्हा विवेक अक्षयच्या घरी जेवायला गेला होता, त्यावेळी अक्षय त्याच्या वेळेलाच म्हणजेच ९.३० ला झोपण्यासाठी गेला होता.