Mumtaz Shares Anecdote of Rajesh Khannas Female Fans: दिग्गज अभिनेत्री मुमताज यांनी राजेश खन्ना, देव आनंद, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन अशा अनेक लोकप्रिय कलाकारांबरोबर काम केले आहे. त्यांच्या अभिनयाची आजही चर्चा होताना दिसते. तसेच मुलाखतींमध्ये त्या त्यांच्या सहकलाकारांच्या आठवणीदेखील सांगताना दिसतात.
आता मुमताज यांनी एका मुलाखतीत राजेश खन्ना यांच्याबद्दल वक्तव्य केले आहे. राजेश खन्ना यांचा चाहतावर्ग खूप मोठा होता. तसेच, महिला चाहत्यांची संख्या खूप जास्त होती. राजेश खन्ना यांची एक झलक पाहण्यासाठी महिला चाहत्या घराबाहेर थांबत असत, असा खुलासा मुमताज यांनी केला.
“आमचा एकही चित्रपट…”
मुमताज यांनी ‘फिल्मीबिट’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत राजेश खन्ना जेव्हा यशाच्या शिखरावर होते, त्या काळाबद्दल बोलताना मुमताज म्हणाल्या, “आमचा एकही चित्रपट फ्लॉफ ठरला नाही. मी आणि राजेश त्या चित्रपटात आहे, म्हणून डिस्ट्रिब्युटर्स तो चित्रपट विकत घ्यायचे. पण, जेव्हा अशा गाजलेल्या कलाकारांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालत नाहीत, तेव्हा त्या कलाकारांना कोणी लक्षात ठेवत नाही.”
राजेश खन्ना यांच्या महिला चाहत्यांबद्दल मुमताज म्हणाल्या, “आम्ही जेव्हा बाहेर शूट करायचो, तेव्हा राजेश खन्ना यांच्या महिला चाहत्या माझ्याकडे पाहून वेडेवाकडे तोंड करायच्या. त्यांच्या महिला चाहत्यांना मी कधीच आवडले नाही. मी त्यांच्याबरोबर रोमान्स करू शकते, म्हणून त्या माझ्यावर ईर्ष्या करायच्या. मी व राजेश खन्ना एकमेकांचे शेजारी होतो. मी माझ्या खिडकीबाहेर पाहायचे, तेव्हा मला त्यांच्या घराबाहेर १० हजार महिला दिसायच्या. त्यातल्या हजारो स्त्रिया तिथेच थांबायच्या. मी विचार करायचे की ही तर समस्या निर्माण झाली.”
मुमताज आणि राजेश खन्ना यांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केले आहे, ज्यामध्ये ‘राम तेरे कितने नाम’, ‘प्रेम कहानी’, ‘आप की कसम’, ‘दो रास्ते’, ‘रोटी’, ‘दुश्मन’, ‘अपना देश’ अशा चित्रपटांचा समावेश आहे.
राजेश खन्ना यांनी खूप यशाचा काळ पाहिला. तसेच त्यांना अपयशही पचवावे लागले. एक काळ असा आला की, लोकांनी त्यांना ओळखणे बंद केले. जॉन पीटर अली यांनी एका लेखात राजेश खन्ना यांना विमानतळावर कोणी ओळख दाखविली नाही. तसेच, त्यांना बसण्यासाठी कोणी जागा दिली, त्यामुळे राजेश खन्ना यांना स्वत:च्या बॅगेवर बसावे लागले.
राजेश खन्ना यांनी डिंपल कपाडिया यांच्याशी लग्न केले होते. मात्र, त्यांचे हे लग्न फार काळ टिकू शकले नाही, त्यांनी घटस्फोट घेत वेगळे होण्याचा निर्णय घेतला.