Mumtaz Talks About Plastic Surgery : स्क्रीनवर त्वचा चांगली दिसावी, वाढतं वय लपवता यावं किंवा चेहऱ्याला विशिष्ट आकार देण्यासाठी काही कलाकार प्लास्टिक सर्जरी, फीलर्स या गोष्टींचा वापर करतात. याबद्दल अनेकदा प्रेक्षकांमध्ये चर्चा होत असते, तर काहीवेळा यामुळे कलाकारांना ट्रोलही केलं जातं. अशातच आता एका लोकप्रिय अभिनेत्रीने यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
बॉलीवूड चित्रपटांत काम करत ९० चा काळ गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे मुमताज. मुमताज यांनी त्यांच्या सौंदर्याने व सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. आजही वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांचं सौंदर्य कमी झालेलं नाही. मुमताज यांनी नुकतीच ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्या सौंदर्यामागचं रहस्य सांगितलं आहे. त्या म्हणाल्या, “जर तुम्हाला सुंदर दिसायचं असले तर तुम्हाला स्वत:ची खूप काळजी घ्यावी लागते.”
मुमताज यांनी यामध्ये, त्या त्यांच्या चेहऱ्याच्या दोन्ही बाजूला दर चार महिन्यांनी फीलर्स घेतात आणि त्यांनी त्या प्लास्टिक सर्जरीच्याही विरोधात नसून ज्याला वाटतं की त्यांना याची गरज आहे त्यांनी ते करावं असं म्हटलं आहे. मुलाखतीमध्ये मुमताज चांगलं दिसण्याबद्दल सांगत असताना म्हणाल्या, “जेव्हा मला माझ्या चेहऱ्यावर थकवा आल्यासारखं जाणवतं तेव्हा मी चेहऱ्याच्या दोन्ही बाजूला फीलर्स घेते. ते १-२ महिने टिकतात. असं मी प्रत्येक चार महिन्यांनी करते.”
मुमताज यांना मुलाखतीमध्ये काही तरुण कलाकार त्यांच्या चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी करतात याबाबत विचारण्यात आलं होतं. यावर त्यांनी, “जर एखाद्या व्यक्तीला वाटत असेल की त्यांना याची गरज आहे तर त्यांनी ते करावं” असं उत्तर दिलं. पुढे त्या असंही म्हणाल्या की, “असं करून ते कोणता गुन्हा करत नाहीयेत. जर मला वाटलं की मला स्वत:मध्ये काही बदल करायचे आहेत तर मीसुद्धा करेन. ज्याला वाटतं त्याने ते करावं.”
मुमताज यांनी मागे ‘रेडिओ नशा ऑफिशियल’सह संवाद साधला होता. यामध्ये त्यांनी त्यांच्या आहाराबद्दल सांगितलं होतं. त्या म्हणाल्या होत्या, “मी माझ्या आहाराकडे खूप काळजीपूर्वक लक्ष देते. मी खूप कमी खाते आणि चुकीचे पादर्थ खाणं टाळते. वेळेवर जेवते, व्यायाम करते. माझ्या चेहऱ्याची, केसांची खूप काळजी घेते. मी स्वत: माझ्या हाताने चेहऱ्यासाठी फेस मास्क तयार करते.”
मुमताज यांनी अभिनेता अक्षय कुमारने याबाबत त्यांना सल्ला दिल्याचं सांगितलं आहे. त्या म्हणाल्या, “अक्षयने मला झोपण्याच्या काही तास आधी जेवण करण्याचा सल्ला दिला होता. मी ९ ते १० च्या दरम्यान झोपते आणि पहाटे ४ किंवा ५ वाजता उठते. त्यानंतर ७ वाजता व्यायाम करते, मग न्याहारी करते आणि दुपारी एकदा जेवण करते. रात्री काहीही खात नाही. अक्षयने मला ५ ते ६ नंतर काही खाऊ नका असं सांगितलं होतं, त्यामुळे मी रात्री जेवण करत नाही.”