Mumtaz shares memories of Rajesh Khanna : राजेश खन्ना आणि मुमताज यांची जोडी पडद्यावर जेवढी गाजली, तेवढीच त्यांची मैत्री खऱ्या आयुष्यातही घट्ट होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मुमताज यांनी खन्ना यांच्या निधनानंतर त्यांचा ‘आशीर्वाद’ हा बंगला विकून पाडल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे. “आजही तिथून जाताना नवी इमारत दिसली की मला दुःख होतं,” असं त्या म्हणाल्या. राजेश खन्ना यांना त्या बंगल्याचे संग्रहालयात रूपांतर करायचे होते, मात्र त्यांच्या निधनानंतर जावई अक्षय कुमार आणि कुटुंबीयांनी तो ९० कोटींना का विकला, हे कोडं अद्याप सुटलं नसल्याचं मुमताज यांनी सांगितलं. ३.५ लाखांना खरेदी केलेल्या या वास्तूशी जोडलेल्या अनेक भावूक आठवणी त्यांनी यावेळी शेअर केल्या आहेत.
२०१२ मध्ये राजेश खन्ना यांचं निधन झालं. त्यानंतर त्यांचा प्रसिद्ध ‘आशीर्वाद’ हा बंगला विकला गेला आणि नंतर पाडण्यात आला, याबद्दल बोलताना मुमताज भावूक झाल्या. मुमताज यांनी सांगितलं ती त्यांनी राजेश खन्ना व त्यांच्या जोडीदार अंजू महेंद्रू यांच्याबरोबर त्या बंगल्यावर खूप चांगला वेळ घालवला होता. खन्ना यांच्या कुटुंबीयांनी तो बंगला का विकला? ते कळत नाही, असं त्या म्हणाल्या.
आशीर्वाद बंगला पाडल्याने मला दुःख झालं – मुमताज
विकी लालवानीने मुलाखतीत मुमताज यांना विचारलं की, ‘आशीर्वाद’ बंगला पाडल्याचं त्यांना दुःख झालं का? यावर त्या म्हणाल्या, “होय. मला खूप वाईट वाटलं. आजही जेव्हा मी त्या जागेवर आता उभी असलेली इमारत पाहते, तेव्हा मी म्हणते, ‘हे माझ्या हिरोचे घर होते.’ मी खूप हळवी आहे. मी अंजू आणि काका (राजेश खन्ना यांचे टोपणनाव) यांच्या खूप जवळ होते. ते मयुरवरही खूप प्रेम करायचे. काका आणि अंजू आमची खूप काळजी घ्यायचे, आम्हाला प्रेमाने खाऊ-पिऊ घालायचे.”
राजेश खन्ना यांची इच्छा होती की त्यांच्या निधनानंतर या बंगल्याचं संग्रहालयात रूपांतर व्हावं, त्याबद्दल मुमताज म्हणाल्या, “पण त्यांच्या निधनानंतर अक्षयजींनी (खन्ना यांचा जावई, अभिनेता अक्षय कुमार) तो का विकला, हे मला माहीत नाही. त्यामागचं कारण मला अजूनही समजलं नाही. मी ऐकलंय की काही कौटुंबिक वाद होते, पण मला जास्त माहिती नाही. जेव्हा तुम्हाला सत्य माहीत नसतं, तेव्हा त्यावर बोलू नये.”
मुमताज यांची बहीण मीना कुमारीच्या घरात राहते
मुमताज जुन्या आठवणींना उजाळा देत म्हणाल्या, “कार्टर रोडवर माझी बहीण मल्लिका ज्या घरात राहते, ते घर पूर्वी मीना कुमारी यांचं होतं. ते राजेश खन्ना यांच्या बंगल्याच्या अगदी जवळ होतं. माझं वारंवार तिथे जाणं व्हायचं, त्यामुळे ‘आशीर्वाद’वरही जाणं-येणं असायचं. जेव्हा अंजू त्यांच्याबरोबर होती, तेव्हा ती मला आवर्जून बोलवायची. माझे मयुरबरोबर लग्न ठरल्यावर मी त्यालाही सोबत घेऊन जायचे. चित्रपटसृष्टीतील माणसं खूप मोठ्या मनाची असतात.”
राजेश खन्ना आणि मुमताज यांनी ‘दो रास्ते’, ‘बंधन’, ‘प्रेम कहानी’, ‘आप की कसम’, ‘सच्चा झुठा’ आणि ‘अपना देश’ यांसारख्या अनेक चित्रपटांत एकत्र काम केलं होतं.
राजेश खन्ना यांचा ‘आशीर्वाद’ बंगला
राजेश खन्ना यांनी हा बंगला राजेंद्र कुमार यांच्याकडून ३.५ लाख रुपयांना विकत घेतला होता. राजेंद्र कुमार यांनी स्वतः तो बंगला अनेक वर्षांपूर्वी फक्त ६५ हजार रुपयांना खरेदी केला होता. हा बंगला घेतल्यावर राजेंद्र कुमार यांच्या करिअरला मोठा फायदा झाला होता. तिथे राहत असताना त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले होते.
राजेश खन्ना यांनी हा बंगला विकत घेतला, तेव्हा त्यांना आपल्या पत्नीच्या नावावरून या बंगल्याचं नाव ‘डिंपल’ ठेवायचं होतं. मात्र, राजेंद्र कुमार यांनी त्यांना दुसरं नाव ठेवण्याची विनंती केली. कारण त्यांच्या मुलीचं नावही डिंपल होतं आणि त्यांच्या घराचं नावही तेच होतं. अशा प्रकारे या बंगल्याला ‘आशीर्वाद’ नाव मिळाले. राजेश खन्नांनी त्यांच्या आयुष्याची शेवटची अनेक वर्षे याच बंगल्यात घालवली होती.
राजेश खन्ना यांच्या निधनानंतर, ‘आशीर्वाद’ बंगला एका व्यावसायिकाला ९० कोटी रुपयांना विकला. आता त्या जागेवर एक बहुमजली इमारत उभी आहे.
