Mumtaz makes a bold statement on Sanjeev Kumar and Zeenat Aman’s stardom: एकेकाळी मोठ्या पडद्यावर राज्य करणाऱ्या अभिनेत्री मुमताज सध्या त्यांच्या रोकठोक विधानांमुळे चर्चेत आहेत. त्यांनी संजीव कुमार आणि झीनत अमान यांच्याबद्दल अत्यंत धक्कादायक मत मांडलं. संजीव कुमार हे विलक्षण अभिनेते होते, मात्र त्यांना दिलीप कुमार किंवा देव आनंद यांच्यासारख्या मोठ्या स्टार्सच्या श्रेणीत ठेवता येणार नाही, असं मुमताज म्हणाल्या. इतकंच नाही तर झीनत अमान यांच्या अभिनयावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “झीनत काही फार चांगली अभिनेत्री नव्हती,” असं म्हणत त्यांनी आजच्या काळात ‘स्टार’ शब्दाचा होणारा सहज वापर चुकीचा असल्याचं स्पष्ट केलं.

दिग्गज अभिनेत्री मुमताज यांनी संजीव कुमार यांच्याबद्दल केलेल्या आपल्या वादग्रस्त विधानावर पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलं आहे. संजीव कुमार हे एक विलक्षण अभिनेते होते, तरीही आपण त्यांना मोठा स्टार मानत नाही, असं त्यांनी म्हटलंय. विकी लालवानीने मुमताज यांना त्यांच्या जुन्या विधानाबद्दल विचारलं. तेव्हा संजीव कुमार हे मोठे हिरो नव्हते, या आपल्या मतावर ठाम राहत त्या म्हणाल्या, “मी काय चुकीचं बोलले? ते एक उत्कृष्ट अभिनेते होते, हे मी नाकारत नाही. पण ‘स्टार’ असणं आणि ‘अभिनेता’ असणं यात मोठा फरक आहे. दिलीप कुमार, देव आनंद, शम्मी कपूर—हे सर्व स्टार्स होते. संजीव कुमार यांनी चरित्र भूमिका आणि अगदी साहाय्यक भूमिकाही केल्या होत्या. ते माणूस म्हणून खूप चांगले होते, सुसंस्कृत होते, पण स्टार आणि अभिनेता यात फरक असतो.”

मुमताज यांनी पुढे स्पष्ट केलं की त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. “तुम्ही म्हणालात की ते खूप मोठे स्टार होते, त्यावर मी उत्तर दिलं की ते खूप मोठे स्टार नव्हते. ते एक चांगले अभिनेते होते, पण मी दिलीप कुमार, देव आनंद आणि अशा आघाडीच्या हिरोंनाच मोठे स्टार मानते,” असं त्या म्हणाल्या.

झीनत अमान फार चांगली अभिनेत्री नव्हती – मुमताज

मुमताज यांना वाटतं की चित्रपटसृष्टीत स्टार हा शब्द आजकाल खूप सहजपणे वापरला जातो. झीनत अमान यांचा विषय निघाल्यावर मुमताज म्हणाल्या, “झीनत अमान, बरं… ती काही फार चांगली अभिनेत्री नाही, हे सांगताना मला वाईट वाटतंय आणि यासाठी मी तिला सॉरी म्हणेन. पण तिला किती पुरस्कार मिळाले? जर तुम्ही प्रत्येकालाच स्टार म्हणू लागलात, तर कसं चालेल? प्रत्येकजण स्टार नसतो.”

स्टारडम मिळवणे ही दुर्मिळ गोष्ट असून त्यासाठी अनेक वर्षे लागतात, असं त्यांनी म्हटलं. “प्रत्येकजण स्टार होऊ शकत नाही; प्रत्येकजण दिलीप कुमार होऊ शकत नाही. स्टार व्हायला अनेक वर्षे लागतात—तिथपर्यंत पोहोचेपर्यंत तुमचं वय उलटून जातं,” असं मुमताज म्हणाल्या. मुमताज यांच्या मते, केवळ मोजकेच कलाकार स्टार आहेत. स्टार अभिनेत्रींमध्ये त्यांनी मीना कुमारी, मधुबाला, नर्गिस, रेखा यांची नावं घेतली.

संजीव कुमार यांच्याबद्दल मुमताज काय म्हणाल्या होत्या?

गेल्या वर्षी मुमताज यांनी म्हटलेलं की, सुरुवातीच्या काळात चित्रपटसृष्टीतील अनेक आघाडीच्या हिरोंनी त्यांच्याबरोबर काम करण्यास नकार दिला होता. “जवळजवळ प्रत्येकाने माझ्याबरोबर काम करण्यास नकार दिला होता आणि मला ‘दारा सिंगची हिरोईन’ असं हिणवलं होतं. जेव्हा शशी कपूर यांनी ‘सच्चा झुठा’ चित्रपटात माझ्याबरोबर काम करण्यास नकार दिला, तेव्हा निर्मात्यांनी त्यांनाच चित्रपट सोडायला सांगितलं. त्यानंतर राजेश खन्नांनी हा चित्रपट केला होता,” असं मुमताज म्हणाल्या होत्या.

मुमताज पुढे म्हणाल्या, “पूर्ण इंडस्ट्रीने माझ्यासोबत काम करण्यास नकार दिला होता, पण नंतर त्या सर्वांनीच माझ्याबरोबर काम केलं. मला त्यांची नावे घ्यायची नाहीत, पण त्यांना माहित आहे की ते कोण आहेत.” जेव्हा मुलाखतकाराने संजीव कुमार यांच्यासह इतर अनेक अभिनेत्यांची नावं घेतली, तेव्हा मुमताज यांनी “संजीव कुमार, तसेही काही मोठे हिरो नव्हते,” असं म्हटलं होतं.

मुमताज आणि संजीव कुमार यांनी १९७० मध्ये ‘खिलौना’ या चित्रपटात एकत्र काम केले होते, जो बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. तसेच, मुमताज यांनी झीनत अमान यांच्याबरोबर १९७१ च्या गाजलेल्या ‘हरे रामा हरे कृष्णा’ चित्रपटात काम केलं होतं.