‘मुन्ना भाई एमबीबीएस’ चित्रपटातील तो तरुण मुलगा तुम्हाला आठवतोय का? जो एका मुलीने रिजेक्ट केल्याने दुखावला जातो आणि स्वतःचे आयुष्य संपवण्याचा प्रयत्न करतो. चित्रपटातील गाणं ‘अपुन जैसे टपोरी’ मध्ये ‘मुन्ना भाई’ त्याच्या मदतीला येतो आणि त्याचे सांत्वन करण्याचा प्रयत्न करतो. ही भूमिका तशी लहान होती, पण २००३ मधील या चित्रपटानंतर तो तरुण म्हणजेच अभिनेता विशाल ठक्कर लोकप्रिय झाला.
विशाल ठक्करने पुढे चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये करिअर केले. तो ‘टँगो चार्ली’मध्ये दिसला. तसेच ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’, ‘थपकी प्यार की’, ‘आहट’ आणि ‘किस देश में है मेरा दिल’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये त्याने काम केलं. टीव्हीवर त्याला खूप यश मिळालं. पण, जानेवारी २०१६ मध्ये तो अचानक कोणताही सुगावा न सोडता बेपत्ता झाला. १० वर्षांहून अधिक काळ उलटून गेल्यानंतरही तो कुठे आहे किंवा त्याच्याबरोबर काय घडलं, याबद्दल काहीच माहिती नाही. विशाल २०२६ मध्ये ४० वर्षांचा असता.
५०० रुपये घेऊन गेलेला विशाल परतलाच नाही
/३१ डिसेंबर २०१५ रोजी विशाल मुलुंडमधील घरी होता. त्याने त्याच्या आई दुर्गाला स्टार वॉर्स थिएटरला बघायला सोबत ये असं सांगितलं. ती गेली नाही आणि त्या गोष्टीचा तिला आजही पश्चात्ताप आहे. कारण त्यानंतर विशाल पुन्हा दिसलाच नाही. रात्री साडेदहा वाजता आईजवळून ५०० रुपये घेऊन विशाल केला. रात्री १ वाजता त्याने वडील महेंद्र यांना मेसेज केला की तो पार्टीला जातोय आणि सकाळी येईल. हा त्याचा शेवटचा मेसेज होता.
विशाल बेपत्ता झाला तेव्हा ३० वर्षांचा होता. २०१९ मध्ये इंडियन एक्सप्रेसशी बोलताना त्याच्या आईने सांगितलं होतं की विशालबरोबर काय घडलं, याची त्यांना काहीच कल्पना नाही.

शेवटचा गर्लफ्रेंडबरोबर दिसला होता विशाल
पोलिसांच्या मते विशाल १ जानेवारीला त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर अहमदाबाद हायवेवरील एका रिसॉर्टमध्ये होता. परतताना दोघे घोडबंदर रोडवरील फाउंटन हॉटेलजवळ थांबले. तिथे विशालने तिला सांगितलं की तो त्याच्या मित्राला अंधेरीला भेटायला जातोय. त्यानंतर त्याचा फोन बंद झाला आणि तो बेपत्ता झाला.

विशाल १ जानेवारीला सकाळी ११.४५ वाजता शेवटचा दिसला होता. तो अंधेरीला जायला रिक्षामध्ये बसला, तिथून तो शूटिंगला जाणार होता. त्याचा फोनच्या कॉल डेटा रेकॉर्ड्सनुसार तो शेवटचा घोडबंदर रोडला होता.
विशाल ठक्करची शेवटची फेसबूक पोस्ट, ना मृतदेह सापडला ना फोन
१ जानेवारीला १२.१० मिनिटांनी विशालने फेसबूकवर सर्वांना नवीन वर्षांच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्याचा फोन बंद झाला आणि पुन्हा कधीच सुरू झाला नाही. त्याच्या घरच्यांना कधीच खंडणीचा फोन आला नाही की त्याच्यासारखा दिसणारा कोणता मृतदेह सापडला नाही. इतकंच काय तर त्याचा फोनही कधीच सापडला नाही. त्याच्या बँक अकाउंट बाबतीतही कोणतीच अॅक्टिव्हिटी झाली नाही. त्यामुळे तो कुठे गेला, त्याच्याबरोबर काय घडलं हे कधीच समजलं नाही.

विशालची गर्लफ्रेंड यात सामील असण्याचा संशय पोलिसांना होता. पण तिच्या जबाबतही काहीच संशयास्पद आढळलं नाही, असं पोलीस अधिकारी महेंद्र पुरी यांनी सांगितलं. तो पळून गेला, त्याचा खून झाला की अपहरण झालं याबद्दल काहीच समजू शकलं नाही.
विशाल बेपत्ता झाल्यानंतर ३ महिन्यांनी त्याच्या कुटुंबाने सांगितलं की त्याच्या गर्लफ्रेंडने त्याच्यावर छळ व बलात्काराचा आरोप केला होता. तक्रारही दिली होती. त्यामुळे त्याने काही केलं असावं, पण त्याच्या गर्लफ्रेंडने सांगितलं की त्यांनी भांडण मिटवलं आणि तिने तक्रार मागे घेतली होती.
