Actor Vishal Thakkar missing case investigation details : मनोरंजन विश्वात असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी एकेकाळी विविध कलाकृतींमध्ये काम करत प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे, पण अचानक ते इंडस्ट्रीपासून दूर गेले आहेत. त्यामुळे आता ते काय करतात, कुठे आहेत याबद्दल कोणालाही फार माहिती नाहीये. असंच काहीसं घडलंय ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ चित्रपटात काम केलेला अभिनेता विशाल ठक्करबरोबर. 

अभिनेता विशाल ठक्कर २००० च्या सुरुवातीच्या काळात बॉलिवूडमधील ओळखीचा चेहरा होता. जरी तो कधी नायकाच्या भूमिकेत झळकला नसला, तरी साहाय्यक भूमिकांमधून त्याने इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती.  विशाल ठक्करच्या सर्वात प्रसिद्ध भूमिकांपैकी एक ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ (Munna Bhai M.B.B.S.) या चित्रपटातील होती. या चित्रपटात विशालने गर्लफ्रेंडच्या धोख्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मुलाची भूमिका साकारली होती. याशिवाय तो ‘चांदनी बार’ आणि ‘टँगो चार्ली’ (Tango Charlie) सारख्या चित्रपटांतही दिसला होता. त्याने ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ आणि ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या लोकप्रिय मालिकांमध्येही काम केलं होतं, पण विविध भूमिका साकारणारा विशाल गेल्या कित्येक वर्षांपासून बेपत्ता असल्याचं म्हटलं जातं. तो काय करतो, कुठे राहतो? याबद्दल कुठलीही माहिती नसल्याचं म्हटलं जातं.

दहा वर्षांपासून आहे बेपत्ता

अभिनेता विशाल गेली जवळपास १० वर्षे बेपत्ता आहे आणि आजपर्यंत त्याच्या विषयी कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. रिपोर्टनुसार, ३१ डिसेंबर २०१५ रोजी विशाल घरातून चित्रपट पाहण्यासाठी बाहेर पडला होता, मात्र त्यानंतर तो कधीच परतला नाही. माध्यमांच्या माहितीनुसार, त्या रात्री सुमारे १०.३० वाजता विशालने आईकडून ५०० रुपये घेतले आणि मुंबईतील मुलुंड येथील घरातून बाहेर पडला. यानंतर १ जानेवारी २०१६ रोजी रात्री सुमारे १ वाजता त्यांने वडिलांना मॅसेज करून सांगितलं की, तो एका पार्टीला जात आहे आणि सकाळपर्यंत घरी परतेल. मात्र, त्यानंतर तो काही घरी परतला नाही.

पोलिसांच्या माहितीनुसार, विशालला शेवटचा त्याच्या गर्लफ्रेंडने १ जानेवारीच्या सकाळी सुमारे ११.४५ वाजता घोडबंदर रोड परिसरात पाहिलं होतं. तेथून त्याने शूटिंगला जाण्यासाठी अंधेरीकडे जाणारी ऑटो पकडली होती. यानंतर त्याचा फोन बंद झाला आणि त्याच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही. पोलिसांना कोणत्याही रुग्णालयातही त्याच्या ओळखीशी मिळतेजुळते कोणी आढळलं नाही. तसंच, तेव्हापासून त्याच्या बँक खात्यातही कोणतीही हालचाल झालेली नाही.

गर्लफ्रेंडवर पोलिसांना होता संशय

विशाल बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र, त्या वेळी या प्रकरणाला फारसं मीडिया कव्हरेज मिळालं नव्हतं. तरीही, वेळोवेळी सोशल मीडिया आणि इंटरनेटवर त्याच्या बेपत्ता होण्याची चर्चा पुन्हा सुरू होत असते. आजही कुटुंबीय आणि चाहते विशालबरोबर नेमकं काय घडलं, याचं उत्तर मिळण्याची वाट पाहत आहेत. २०२१ मधील एका Reddit पोस्टनुसार, या प्रकरणाची चौकशी करणारे माजी अधिकारी महेंद्र पुरी यांनी सांगितलं होतं की, सुरुवातीला पोलिसांना विशालच्या गर्लफ्रेंडवर संशय होता. मात्र, तिच्या जबाबात कोणतीही विसंगती आढळली नाही. एका दुसऱ्या पोलिस अधिकाऱ्यानेही सांगितलं होतं की, हे प्रकरण हत्या, अपहरण की विशाल स्वतःहून कुठेतरी निघून गेला होता, हे पोलिसांना स्पष्टपणे समजू शकलं नाही. 

गर्लफ्रेंडचा झाला मृत्यू

हे प्रकरण बॉलिवूडमधील अजूनही न सुटलेलं गूढ मानलं जातं. विशेष म्हणजे, बेपत्ता होण्याच्या सुमारे तीन महिन्यांपूर्वी विशालवर त्याच्या गर्लफ्रेंडने बलात्काराचा आरोप केला होता. रिपोर्टनुसार, तिने पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. मात्र, नंतर दोघांमध्ये चर्चा झाली आणि तक्रार मागे घेण्यात आली. हे प्रकरण आणखी गूढ ठरलं, जेव्हा काही महिन्यांनंतर विशालची गर्लफ्रेंडही तिच्या फ्लॅटमध्ये मृत अवस्थेत आढळली. सुरुवातीच्या माहितीनुसार, तिच्या मृत्यूचं कारण हृदयविकाराचा झटका असल्याचं सांगण्यात आलं होतं. आजही विशाल ठक्करचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. त्याला बेपत्ता होऊन तब्बल १० वर्षे झाली आहेत.