Ashwini Kalsekar Talks About Husband : अश्विनी काळसेकर व मुरली शर्मा बॉलीवूडमधील लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहेत. परंतु, तरीसुद्धा बऱ्याच लोकांना हे दोघे नवरा-बायको आहेत याबद्दल माहिती नाहिये. अशातच या दोघांनी नुकतेच त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितलं आहे.

अश्विनी काळसेकर व मुरली शर्मा दोघांनीही चित्रपटांतून आजवर ग्रे शेडच्या भूमिका साकारत त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मुरली शर्मा यांनी त्यांच्या संघर्षकाळाबद्दल सांगितलं आहे. यावेळी त्यांनी त्यांची पहिली भेट आणि संसार याबद्दलही सांगितलं आहे.

‘अशी’ झालेली पहिली भेट

‘कर्ली टेल्स’लशी संवाद साधताना तुमची पहिली भेट कशी झाली याबद्दल विचारल्यानंतर अश्विनी काळसेकर म्हणाल्या, “तो पत्रकार होता, त्यामुळे मी त्याला ओळखत होते. तो बऱ्याचदा सेटवर यायचा.” मुरली शर्मा याबद्दल पुढे म्हणाले, “मी दैनंदिन जीवनातील खर्च भागवण्यासाठी मिळेल ती कामं करत असे, त्यावेळी ती मला भाव द्यायची नाही.”

Award Banner

अश्विनी काळसेकर यावर म्हणाल्या, “मी मितभाषी आणि लाजाळू आहे. पण, मुरली मनकवडा आहे. तो खूप चांगला गातोसुद्धा.” पुढे त्यांना तुमच्या दोघांमध्ये कोण आधी सॉरी म्हणतं अस विचारल्यानंतर अश्विनी म्हणाल्या, “मी म्हणते. तो ६ महिने माझ्याशी बोलला नव्हता. त्याला राग आला की तो पुस्तक घेऊन रूममध्ये जातो आणि वाचत बसतो.” यावर अभिनेते म्हणाले, “विचार करा, याचा अर्थ तिने किती मोठी चूक केली असेल. मी आता ते सांगणार नाही, कारण मी पती परमेश्वरसारखा नवरा आहे, हे ती खूप आधीचं सांगत आहे.”

मुरली व अश्विनी यांना त्यांच्या वयातील अंतराबद्दल विचारल्यानंतर अश्विनी म्हणाल्या, “मी एक वर्षाने मोठी आहे, पण त्याला असं वाटतं की मी दीड वर्षांनी मोठी आहे.” पुढे त्या गंमत करत म्हणाल्या, “खऱतंर तो माझ्या आजोबांच्या वयाचा वाटतो.”