फराह खानने ताज्या व्लॉगमध्ये दिलीपबरोबर अभिनेते मुरली शर्मा आणि अभिनेत्री अश्विनी काळसेकर यांच्या घरी भेट दिली. त्यांनी मुंबईतील त्यांच्या घरी फराहचं स्वागत केलं आणि नंतर ‘बैंगन पाचडी’ बनवली. यावेळी ‘मैं हू ना’ चित्रपटाची दिग्दर्शिका फराहने, त्या चित्रपटात ‘खान’ची भूमिका साकारणाऱ्या मुरली शर्माबरोबरच्या आठवणींना उजाळा दिला. शूटिंगदरम्यान मुरली शर्माला चुकून सुरक्षा दोरीच्या साहाय्याने वर लटकवण्यात आलं होतं, जे पाहून शाहरुख खान खूप हसला होता.
मुरली शर्मा म्हणाले, “मला फक्त पहिल्या मजल्यापर्यंतच उडायचं होतं.” यावर फराह म्हणाली, “त्या काळात सुरक्षा दोरी फार चांगल्या गुणवत्तेची नसायची आणि लोकांना ती व्यवस्थित वापरताही यायची नाही. शाहरुखला फक्त कारमधून बाहेर पडायचं होतं आणि मुरली दरवाजाला लटकून होता, पण मुरली आणि कारचा दरवाजा दोन्ही एकदम वर उडाले.”
लोळत लोळत हसू लागला शाहरुख खान
मुरली पुढे म्हणाले, “हे सगळे लोक हसत होते. दोरीला लटकण्याचा माझा हा पहिलाच अनुभव होता. शाहरुख सर आले आणि त्यांना हा पूर्ण शॉट दाखवण्यात आला. तो शॉट पाहून ते जमिनीवर लोळत लोळत हसू लागले.” हे ऐकताच अश्विनी काळसेकर मोठ्याने हसत म्हणाल्या, “आजही तुम्ही तो शॉट पाहिला, तर त्याच्या चेहऱ्यावरचे ते भीतीचे भाव अगदी खरे वाटतात.”
मुरली शर्मा व अश्विनी काळसेकर यांची लव्ह स्टोरी
फराह व दिलीपबरोबर गप्पा मारताना मुरली शर्मा व अश्विनी काळसेकर यांनी त्यांची प्रेम कहाणी सांगितली. २००५ मध्ये ‘अपहरण’ चित्रपटाच्या सेटवर भेटल्यानंतर, मुरली आणि अश्विनी यांनी २००९ मध्ये लग्नगाठ बांधली. आरोग्यासंबंधित व आर्थिक अडचणींमुळे त्यांना स्वतःचं मूल होऊ शकलं नाही, याबद्दल या दोघांनी आधीही अनेकदा मोकळेपणाने सांगितलं आहे. अशातच वातावरण थोडे हलकेफुलके करण्यासाठी, दिलीप हा ‘गोलमाल’ चित्रपटातील मुकेश तिवारी यांच्या प्रसिद्ध ‘वसूली भाई’ या पात्राच्या कपड्यांमध्ये आला.
मुरली शर्मा आणि अश्विनी काळसेकर यांचं घर
मुंबईतील मुरली आणि अश्विनी यांचं घर खूप प्रशस्त आहे. त्यांच्या घराची थीम पांढऱ्या रंगाची आहे. भिंती, छत ते पडदे, सगळंच फिकट रंगांचं आहे. त्याला मॅचिंग असे तपकिरी रंगाचे सोफे घरात आहेत. या दोघांनाही वाचनाची खूप आवड आहे हे त्यांच्या एका खोलीतील पुस्तकांच्या मोठ्या कपाटावरून स्पष्ट दिसत होते. यावेळी अश्विनीने तिच्या मेकअपची जागा दाखवली आणि सांगितलं की चित्रपटांसाठी स्वतःचा ती मेकअप स्वतःच करते. यावर फराह म्हणाली, “कलाकार असेच असायला हवेत. लोक मेकअप आर्टिस्टला एक-एक लाख रुपये देतात. काहीतरी शिका, यामुळे आपले किती पैसे वाचतात.”
