मनोरंजन विश्वात असे अनके सेलिब्रिटी कपल आहेत ज्यांनी हटके अंदाजात त्यांच्या जोडीदाराला प्रपोज करत प्रेमाची कबुली दिली आहे. अशातच आता लोकप्रिय अभिनेत्री अश्विनी काळसेकर यांनीसुद्धा त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल सांगितलं आहे. यावेळी त्यांनी अभिनेते मुरली शर्मा यांनी त्यांना हटके अंदाजात प्रपोज करत मागणी घातल्याचं सांगितलं आहे.

अश्विनी काळसेकर व मुरली शर्मा मनोरंजनविश्वातील लोकप्रिय सेलिब्रिटी कपलपैकी एक आहेत. हल्ली दोघे सोशल मीडियावरही सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं. अशातच अश्विनी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांना मुरली शर्मा यांनी कसं प्रपोज केलं होतं याबद्दल सांगितलं आहे. यावेळी त्यांनी मुरली शर्मा तसे लाजाळू स्वभावाचे आणि कमी बोलणारे आहेत मात्र तरीसुद्धा अश्विनी यांना त्यांनी एकदम हटके पद्धतीने प्रपोज करत त्यांना आश्चर्यचकित केल्याचं म्हटलं. याबद्दल बोलताना त्या भावुक झाल्याचंही पाहायला मिळालं.

मुरली शर्मा यांनी अश्विनी यांना हटके अंदाजात केलेलं प्रपोज

लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत अश्विनी काळसेकर म्हणाल्या, “मी त्याला दीड महिन्यानंतर भेटणार होते. त्यामुळे मी उत्सुक होते. त्यावेळी तो छान तयार होऊन आला होता आणि मी त्याला हाय म्हटल्यानंतर त्याने त्याच्या हातात मागे लपवलेलं प्लॅक कार्ड काढलं त्यावर लिहिलं होतं आय मिस यू, दुसरं प्लॅक कार्ड काढलं त्यावर लिहिलं होतं, मला तुझ्याबरोबर म्हातारं व्हायला आहे. तिसऱ्या कार्डवर आय लव्ह यू असं लिहिलं होतं. मी आश्चर्यचकीत झाले होते. सगळे त्याला बघत होते आणि सगळ्यांसमोर त्याने प्लॅक कार्ड काढले मी त्याचवेळी तिथेच भारावले होते. मी तो प्रपोज करेन याची अपेक्षाच केली नव्हती कारण तो खूप लाजाळू आहे. मुरली शर्मा हा माणूसच खूप कमी बोलणारा आहे त्यामुळे त्याने एवढं करावं आणि तेही सगळ्यांसमोर हे अनपेक्षित होतं.”

अश्विनी यांनी पुढे सांगितलं की ठत्याकाळी त्याचे ‘मै हुँ ना’, ‘अपरहण’ वगैरे सगळे चित्रपट आले होते. त्यामुळे इतक्या मोठ्या कलाकाराने विमानतळावर मोठे प्लॅक कार्ड घेऊन उभं राहावं. मला तर आजही कळत नाही की याबद्दल काय प्रतिक्रिया द्यावी.” यावेळी त्यांनी सांगितलं की मुरली यांना त्या दिवशी भेटायला जाण्यासाठी त्या त्यांच्या आईला खोटं कारण सांगून गेल्या होत्या. यावेळी त्यांनी मुरली शर्मा मितभाषी असले तरी तेच जास्त रोमँटिक आहेत असं सांगितलं आहे. अश्विनी व मुरली शर्मा यांनी २००९मध्ये लग्न केलं होतं. गेल्या १७ वर्षांपासून ही जोडी एकत्र सुखाचा संसार करत आहे.