‘मर्डर २’ मधील सिरीयल किलर आठवतोय का? ही भूमिका अभिनेता प्रशांत नारायणनने साकारली होती. प्रशांत मागील तीन दशकांहून अधिक काळापासून इंडस्ट्रीत सक्रिय आहे. त्याच्या बऱ्याच भूमिकांचं प्रचंड कौतुक झालं. पण प्रशांत त्याच्या वक्तव्यामुळेही चर्चेत असतो. त्याने त्याच्या बऱ्याच सहकलाकारांवर टीका केली. त्याच्यामते कार्तिक आर्यन हा सर्वात वाईट अभिनेता आहे.
बॉलीवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत, प्रशांतने सेटवर काही कलाकारांकडून सतत सूचना केल्या जातात, त्याबद्दल मत मांडलं. “निर्मात्यांच्या सेटवर प्रँक्स करणं योग्य नाही. आणि मला वाटते की जे कलाकार फार सूचना देतात, ज्यांना खूप प्रश्न पडतात ते कमी प्रतिभावान असतात. काही जण शॉट कसा घ्यावा जेणेकरून त्यांचे शरीर भव्य दिसेल असं सुचवतात. काही जण तर शॉटच्या आधी डंबेल उचलून त्यांचे सिक्स-पॅक किंवा एट-पॅक दाखवतात. या कलाकारांना वाटते की जर त्यांनी असे प्रश्न विचारले तर समोरच्याला वाटेल की ते हुशार आहेत. निर्मात्यांना ते आवडत नाहीत, पण त्यांनी पैसे लावलेले असतात म्हणून ते हे सर्व सहन करतात. हे कलाकार त्यांच्यासाठी फक्त व्यवसायाचं साधन आहेत,” असं प्रशांत म्हणाला.
प्रशांत नारायणनने हिंदी, बंगाली आणि मल्याळम चित्रपट, तसेच टेलिव्हिजनमध्ये काम केलं आहे. “मी अशा लोकांबरोबर काम करणं टाळतो, ज्यांचा मला कंटाळा येतो. कारण इतके प्रश्न विचारल्यानंतरही ते चांगलं काम करतील असं नाही,” असं स्पष्ट मत प्रशांतने मांडलं.
कार्तिक आर्यन वाईट अभिनेता
कार्तिक आर्यनबद्दल विचारल्यावर प्रशांत म्हणाला, “मला वाटते की तो आपल्या इथल्या सर्वात वाईट अभिनेत्यांपैकी एक आहे. पण तो खूप नशीबवान आहे आणि त्याच्या आई-वडिलांच्या आशीर्वादामुळे टिकून आहे. त्याला चांगला संवाद साधता येत नाही. पण त्याच्या आजूबाजूच्या लोकांकडून त्याला प्रोत्साहन मिळतं. त्याने केलेल्या पहिल्या चित्रपटात – प्यार का पंचनामामध्ये मला तो आवडला होता.”
भारतीय प्रेक्षक लोकांवर हसतात
करोनानंतर थिएटर्समध्ये प्रेक्षक खेचून आणण्याचं बरंच श्रेय कार्तिक आर्यनला दिलं गेलं होतं. कारण त्याच्या भूल भुलैया २ आणि सत्यप्रेम की कथा यासारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली होती. याची आठवण करून देत प्रशांत म्हणाला, “लोक या कलाकारांचं कौतुक करत आहेत की नाही हे मला माहित नाही, पण मी लोकांना त्यांच्यावर हसताना पाहिलंय. जर तुम्ही एखाद्याला हसवू शकत असाल तर ते चांगलंय, पण एखाद्याबरोबर हसणं आणि एखाद्यावर हसणं यात फरक आहे. मला वाटतं की भारतीय प्रेक्षक बरेचदा लोकांवर हसतात.”
नशिबाला गृहित धरू नये – प्रशांत
प्रशांत पुढे म्हणाला, “नशिबाला गृहीत धरू नये. चंदू चॅम्पियन आणि तू मेरी हे त्याचे चित्रपट चालले नाहीत. जर भारतीय प्रेक्षक त्यांच्या कष्टाचे पैसे, वेळ खर्च करत असतील तर तुम्ही चित्रपट पाहण्यासारखे बनवले पाहिजे. तुम्ही काहीतरी बनवून ४० कोटी रुपये घेऊ शकत नाही. लग्नात नाचण्याची आणि पान मसाल्याची जाहिरात करण्याची काय गरज आहे?”
खरं तर प्रशांतने एखाद्या सहकलाकारावर टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी त्याने पद्मावतमध्ये अलाउद्दीन खिलजीची भूमिका साकारल्याबद्दल रणवीर सिंहवर टीका केली होती. या भूमिकेची तयारी करण्यासाठी रणवीरने स्वतःला अंधाऱ्या खोलीत कोंडून घेतल्याचा दावा केला होता. याची खिल्ली उडवत प्रशांत सिद्धार्थ कन्ननशी बोलताना म्हणाला, “तो खोटं बोलतोय. अंधारात राहणं वगैरे सर्व फालतू गोष्टी आहेत.” प्रशांतच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी त्याच्यावर टीका केली होती.

