Bollywood Composer Reveals His Father Replace With Salman Khan : बॉलीवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री भाग्यश्रीचा यांचा गाजलेला चित्रपट म्हणजे ‘मैंने प्यार किया’. हा चित्रपट ८०च्या दशकात बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. चित्रपटाची कथाच नाही; तर त्यातील गाणीही सुपरहिट झाली होती.

पण तुम्हाला माहित आहे का, सूरज बडजात्या यांच्या ‘मैने प्यार किया’ या चित्रपटात सलमान खान आधी एका वेगळ्या कलाकाराने काम केले होते. पण दोन शेड्यूल्सनंतर ही भूमिका सलमानला देण्यात आली. नेमका काय घडलेलं? चला जाणून घेऊ…

नुकत्याच एका मुलाखतीत संगीतकार अमाल मलिकने खुलासा केला की, त्याचे वडील डबू मलिक यांनी ‘मैने प्यार किया’ या चित्रपटाचे दोन शेड्यूल्स शूट केले होते, परंतु कोणतीही माहिती न देता त्यांच्या जागी सलमानची निवड करण्यात आली.

ते नायक म्हणून निवडले गेले होते अन्…

‘फिल्मफेअर’बरोबरच्या संवादात अमाल म्हणाला, “जेव्हा माझे वडील ३४-३५ वर्षांचे होते, तेव्हा ते भविष्याचा विचार करण्यात पूर्णपणे हरवून गेले होते. मी त्यांना तासनतास खुर्चीवर बसून ‘पुढे काय करायचं’ हा विचार करताना पाहिलं आहे. त्यांनी अभिनयात नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला होता. ‘मैने प्यार किया’ चित्रपटात ते नायक म्हणून निवडले गेले होते आणि त्यांनी सुरुवातीचे दोन शेड्यूल्स शूटही केले होते.”

तो पुढे म्हणाला, “फोटोशूट आणि इतर सर्व गोष्टी पूर्ण झाल्या होत्या. पण त्याचदरम्यान एक अत्यंत देखणा तरुण तिथे आला आणि तो म्हणजे सलमान खान. माझे वडील सांगतात की, जेव्हा ते बडजात्या यांच्या ऑफिसच्या पायऱ्या उतरत होते, तेव्हा त्यांनी एका देखण्या मुलाला पाहिले.”

वडिलांना काहीच सांगितलं नाही अन्…

त्यानंतर अमालने सांगितले की, “वडिलांनी तिथल्या सिक्युरिटी गार्डला विचारले की हा कोण आहे? तेव्हा तो म्हणाला, ‘हा चित्रपटाचा मुख्य अभिनेता आहे’. माझ्या वडिलांना याबद्दल काहीच सांगण्यात आले नव्हते. त्यांनी शूटिंग केले होते, कॅसेट तयार झाली होती. अनेक वर्षांनंतर जेव्हा ते सोहेल खानबरोबर संगीत क्षेत्रात काम करत होते, तेव्हा त्यांनी ही आठवण सलमानला सांगितली.”

माझ्या जन्मानंतर आम्हाला घर सोडून…

याच मुलाखतीत अमालने आणखी एक प्रसंग सांगितला. “माझ्या जन्मानंतर आम्हाला घर सोडून भाड्याच्या घरात राहावे लागले होते. तेव्हा वडिलांना काळजी वाटायची की आपल्या लहान मुलाचा सांभाळ कसा करायचा? जर माझी आई खंबीरपणे उभी राहिली नसती, तर माझे वडील त्या कठीण काळातून कसे सावरले असते, हे मला माहीत नाही. माझ्या आईनेच वडिलांना धीर दिला आणि ती कठीण परिस्थिती खंबीरपणे सांभाळली.”

दरम्यान, संगीतकार अमाल मलिकने अनेकदा आपल्या कुटुंबाच्या आर्थिक संघर्षाबद्दल आणि त्याचे वडील संगीत दिग्दर्शक डबू मलिक यांच्या करिअरमधील चढ-उतारांबद्दल मोकळेपणाने सांगितले आहे. ‘बिग बॉस १९’ मध्ये असतानाही अमालने मलिक कुटुंबाच्या स्वतःच्या हिंमतीवर यशस्वी होण्याच्या जिद्दीवर स्पष्टपणे मत मांडले होते. अशातच त्याने पुन्हा वडिलांच्या संघर्षाचा काळ सांगितला आहे.