Pakistani Politician Nabil Gabol Praises Rakesh Bedi : धुरंधर २’ची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपट तुफान कमाई करत आहे. अनेक जणांनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. तर काहींनी यावर टीकासुद्धा केली. यापैकीच एक आहेत पाकिस्तानी राजकारणी नबील गबोल. आधी त्यांनी चित्रपटातील राकेश बेदी यांनी साकारलेलं जमील जमाली हे पात्र त्यांच्यावर आधारित असल्याचं म्हटलेलं आणि ‘धुरंधर’वर केली होती. पण, आता त्यांनी पुन्हा याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार नबील गबोल यांनी ते धुरंधरचा ३ भाग काढणार आणि त्यातून ल्यारीचं सत्य सांगणार असं मुलाखतीत म्हटलं होतं. त्यावेळी त्यांनी हे पात्र त्यांच्यावरच आधारित असल्याचाही दावा केलेला. पण, आता चक्क राकेश बेदी यांचं त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत कौतुक केलं आहे ज्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत.
उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार काही दिवसांपूर्वी एका व्हायरल व्हिडीओमध्ये ते धुरंधरच्या पहिल्या भागावर टीका करत म्हणालेले, “आम्ही धुरंधरचा ३ भाग बनवू. अर्थात आम्ही त्याचा धुरंधर हे नाव देणार नाही. पण, त्यातून आम्ही भारतीयांना ल्यारी आणि नबील गबोल यांच्याबद्दल सांगू.” अशातच आता एका मुलाखतीत ते राकेश बेदींचं कौतुक करताना दिसत आहेत. नबील गबोल राकेश यांच्याबद्दल नेमकं काय म्हणाले याबद्दल जाणून घेऊयात…
नबील गबोल यांनी राकेश बेदींचं केलं कौतुक
मुलाखतीत नबील गबोल म्हणाले, “राकेश बेदींना माझा निरोप द्या. ते ज्येष्ठ कलाकार आहेत आणि मी त्यांचा आदर करतो. आय लव्ह यू”. ‘इंडियन स्पाय’ ही गाबोलविषयीची थिअरी अधिक चर्चेत आली, जेव्हा ‘धुरंधर’मध्ये जमील जमाली हे पात्र ४५ वर्षांपासून काम करणारा भारतीय गुप्तहेर आहे असं दाखवण्यात आलं. अनेकांना वाटतं की हे पात्र गाबोलवरून प्रेरित आहे. त्यामुळे सोशल मीडियावर अशा अनेक मीम्स व्हायरल झाल्या आहेत, ज्यात गाबोल स्वतःच गुप्तहेर असू शकतो, असंही म्हटलं जात आहे.
‘धुरंधर’ चित्रपट ५ डिसेंबरला रिलीज झाल्यानंतर गाबोल यांनी त्यावर टीका केली होती. एका व्हायरल व्हिडिओमध्ये नाराजी व्यक्त करत ते म्हणाले, “चित्रपटात माझं पात्र खूप महत्त्वाचं दाखवलं आहे, पण ते खूप वेगळ्या पद्धतीनं दाखवलं आहे. त्यांनी ते खूप ‘दबंग’ स्टाइलमध्ये दाखवलं आहे. म्हणजे माझी भूमिका नीट मांडलेली नाही. त्यांनी ल्यारीला दहशतवादी ठिकाण म्हणून दाखवलं आहे.”
पुढे ते म्हणाले, “देवाच्या कृपेने काही आखाती देशांनी या चित्रपटावर बंदी आणली आहे.” जागतिक स्तरावरील चित्रपटाच्या बंदीबद्दल विचारल्यानंतर ते म्हणाले, “जागतिक बंदीसाठी मोठ्या प्रमाणात साधनं लागतात, जी माझ्याकडे नाहीत.”
