Nagarjuna Reacts To Dhurandhar Rumours : अक्षय खन्ना ‘धुरंधर’मधील भूमिकेमुळे चर्चेत आहे. त्याने यामध्ये साकारलेल्या रहमान डकैतच्या भूमिकेने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. चित्रपटातील त्याचे संवाद, एन्ट्री, डान्स हे सगळंच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं, त्यामुळे देशभरातून अनेकांनी त्याच्या कामाचं कौतुक केलं. अशातच दाक्षिणात्य अभिनेत्यानेही त्याचं कौतुक करत ‘धुरंधर’बद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
‘धुरंधर’मध्ये रहमान डकैतच्या भूमिकेसाठी विचारणा झाली होती, पण नकार दिला अशी अफवा दाक्षिणात्य अभिनेते नागार्जुन यांच्याबद्दल पसरली होती.परंतु, त्याने स्वत: याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्याने अदित्य धरच्या दिग्दर्शनाचं कौतुक करत ‘धुरंधर’मध्ये काम करायला आवडलं असतं, अशी इच्छाही व्यक्त केली आहे. नागार्जुन याबद्दल नेमकं काय म्हणाले याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
नागार्जुन नेमकं काय म्हणाले?
‘बॉलीवूड हंगामा’शी संवाद साधताना नागार्जुन याबद्दल म्हणाले, “असं अजिबात नाहीये, मला त्या रोलसाठी विचारणा झाली नव्हती. पण, मला आवडलं असतं त्यामध्ये काम करायला. ‘धुरंधर’ सुपरहिट चित्रपट आहे. आदित्य धरने खूप छान दिग्दर्शन केलं आहे. मला त्याचा या आधीचा ‘उरी’ चित्रपटही खूप आवडलेला. सगळ्यांनीच खूप छान अभिनय केला आणि अक्षय खन्नाने तर कमाल काम केलंय. दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहे.”
‘धुरंधर’बद्दल बोलताना नागार्जुन यांनी स्पष्ट केलं की, त्यांना ‘धुरंधर’ कधीच ऑफर झाला नव्हता आणि त्यांनी रहमान डकैतच्या भूमिकेला नकार दिलेलाच नाही. अक्षय खन्नाने साकारलेलं रहमान डकैत हे पात्र ‘धुरंधर’मधील महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक आहे. अनेक प्रेक्षकांनी अक्षय खन्ना इतरांच्या तुलनेत भाव खाऊन गेला असंही म्हटलं आहे. चित्रपटातील त्याच्या फासला गाण्यावरील एन्ट्रीमुळे तो तुफान व्हायरल झाला आणि त्यानंतर तो अनेकांच्या चर्चेचा विषय ठरला.
दरम्यान, ५ डिसेंबर २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ने बॉक्स ऑफिसवरचे अनेक रेकॉर्ड मोडले, तर चित्रपट प्रदर्शित होऊन दोन महिने होऊन गेल्यानंतरही आजही चित्रपटाची तिकीट विक्री सुरू आहे. महत्त्वाचं म्हणजे ओटीटीवर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही प्रेक्षक थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहण्याला अधिक पसंती देत आहेत.न

