Nakul Kapoor Yoga Trainer in Canada: बॉलीवूडमध्ये ९० चे दशक हे शाहरुख खान, सलमान खान व आमिर खान यांनी पूर्णपणे गाजवले होते. या तिन्ही खानांच्या सिनेमांची बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई होत होती आणि सर्वत्र त्यांचीच चर्चा होती; पण सिनेविश्वात दिल्लीहून असा एक तरुण अभिनेता आला, ज्याने त्या काळातही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. बॉलीवूडचा ‘चॉकलेट बॉय’ म्हणून लोकप्रियता मिळवलेला नकुल कपूर हा सध्या योगाचे क्लासेस घेत आहे.

नकुल कपूर हा ‘तुम से अच्छा कौन है’ या सिमेमातून रातोरात लोकप्रिय झाला होता. त्याचा जबरदस्त लूक आणि व्यक्तिमत्त्वामुळे त्याने वेगळी ओळख निर्माण केली होती. ‘आँख है भरी भरी’, अशी गाजलेली गाणी आणि पहिल्याच सिनेमाला मिळालेल्या तुफान यशामुळे तो सिनेविश्वातील आघाडीचा अभिनेता होईल, अशी चर्चा होती. मात्र, अवघ्या काही सिनेमांमध्ये काम केल्यानंतर त्याने बॉलीवूडमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

‘थम्स अप’च्या जाहिरातीतून केलेली सुरुवात

नकुल कपूर हा मूळचा दिल्लीचा असून, लहानपणापासूनच त्याला खेळाची आवड होती. तो उत्कृष्ट ड्रायव्हर असल्याने त्याने राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागही घेतला होता. बंजी जंपिंगसारख्या साहसी खेळांची त्याला आवड होती; पण त्याने ‘थम्स अप’ची एक जाहिरात केली आणि तो नकुल चर्चेत आला. त्यातूनच त्याचा सिनेविश्वातील प्रवास सुरू झाला. सुरुवातीला त्याने मॉडेलिंग केले आणि नंतर अभिनयाची संधी मिळाली.

१९९८ ते २००१ या काळात नकुल कपूर हा अनेक लोकप्रिय म्युझिक व्हिडीओंमध्ये दिसून आला होता. त्यामध्ये शिबानी कश्यपचे ‘हो गयी है मोहब्बत तुमसे’ आणि नुसरत फतेह अली खान यांचे ‘आजा मेरे यार’ यांसारख्या गाण्यांचा समावेश होता. गाण्यामुळे त्याने चाहत्यांबरोबर चित्रपट निर्मात्यांचे लक्ष वेधले. २००२ मध्ये नकुल कपूरने दीपक आनंद दिग्दर्शित ‘तुम से अच्छा कौन है’ या चित्रपटातून पदार्पण केले. किम शर्मा व आरती छाब्रियाबरोबर स्क्रीन शेअर करीत त्याने अर्जुन सिंहची भूमिका साकारली होती. त्याचा पहिलाच सिनेमा हिट झाला आणि नकुल कपूरला‘चॉकलेट बॉय’ म्हणून ओळख मिळाली.

अभिनेता नकुल कपूर

मात्र, पदार्पणानंतर नकुलने मोजक्याच काही सिनेमांमध्ये काम केले. त्यानंतर तो बॉलीवूडमधून बाहेर पडला. २००५ मध्ये तो कॅनडातील ‘टर्मिनल सिटी’ या टीव्ही मालिकेत भूमिका साकारताना दिसला होता; पण नंतर तो कोणत्याही प्रोजेक्टमध्ये काम करताना दिसला नाही. बॉलीवूडच्या खानप्रमाणे ज्याचे करिअर असेल अशी चर्चा असताना नकुल मात्र लाइमलाईटपासून लांब झाला.

सिनेविश्व सोडल्यानंतर नकुलने योग आणि अध्यात्माकडे लक्ष केंद्रित केले. तो कॅनडातील ब्रिटिश कोलंबियामधील व्हँकुव्हर येथे स्थायिक झाला. योगाची आवड असल्याने त्याने हीच आवड व्यवसायात रूपांतरित केली. सध्या नकुल कपूर हा योग शिक्षक म्हणून काम करतो. त्याचे ‘डिव्हाइन लाइट योगा’ असे योग केंद्र असून, ‘डिव्हाइन लाइफ’ या नावानेही ओळखले जाते.