‘द बंगाल फाइल्स’मधील निर्दयी गुलाम सरवर हुसेनीच्या भूमिकेमुळे नमाशी चक्रवर्तीला वेगळी ओळख मिळाली. ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा असलेल्या नमाशीने २०२३ मध्ये ‘बॅड बॉय’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. मात्र, कोविड-१९मुळे चित्रपटाचं प्रदर्शन लांबलं आणि तो प्रदर्शित होईपर्यंत काहीसा जुना वाटू लागला. त्यामुळे अनेक जण २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द बंगाल फाइल्स’लाच त्याचा पहिला चित्रपट समजतात, असं नमाशीने सांगितलं आहे.
‘स्क्रीन’ला दिलेल्या मुलाखतीत नमाशी चक्रवर्तीने चित्रपटसृष्टीतील एक कटू अनुभव सांगितला. एका विशिष्ट टॅलेंट एजन्सीमार्फत त्याचं प्रतिनिधित्व होत नसल्यामुळे त्याला या अनुभवाला सामोरं जावं लागलं होतं. नमाशीने सांगितलं की, त्याने ॲमेझॉन प्राइमच्या एका मोठ्या वेब सीरिजसाठी ऑडिशन दिलं होतं. कास्टिंग डायरेक्टरने त्याला सांगितलं होतं की, दिग्दर्शकाला तो खूप आवडला आहे. नमाशीच्या मते, त्याने या भूमिकेसाठी चांगलं ऑडिशन दिलं होतं, कारण त्याला त्या व्यक्तिरेखेचं स्वरूप आणि स्वभाव नीट समजला होता. त्याने हा अनुभव सांगताना चित्रपटसृष्टीतील एक कटू वास्तवही उघड केलं.
नमाशीने सांगितला प्रसंग
नमाशीने पुढे सांगितलं की, काही दिवसांपूर्वी मुंबईतील ‘सोहो हाऊस’ येथे त्याची त्या वेब सीरिजच्या दिग्दर्शकाशी अचानक भेट झाली. त्यावेळी त्याने दिग्दर्शकाला ऑडिशनबद्दल विचारलं. यावर दिग्दर्शकाने नमाशीला सांगितलं की, त्याच्या फोटोवरून आणि व्यक्तिमत्त्वावरून त्याने ऑडिशन चांगलं दिलं असावं, असं त्याला वाटतं. मात्र, दिग्दर्शकाने पुढे चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाची बाब स्पष्ट केली. तो म्हणाला, “मी दिग्दर्शक असलो, तरी तुला या सीरिजमध्ये घ्यायचं की नाही, हे ॲमेझॉन ठरवतं. त्यांचे काही आवडते कलाकार आहेत. जर त्यांनी तुझं ऑडिशन चांगलं झालं आहे आणि तू त्या भूमिकेसाठी योग्य दिसतोस, असं मान्य केलं, तर मी तुझ्यासाठी नक्की प्रयत्न करेन. पण त्यांनी तुला न घेण्याचा निर्णय घेतला, तर दिग्दर्शक म्हणून मला ठाम भूमिका घ्यावी लागेल.”
महिनाभरानंतर नमाशी चक्रवर्तीला समजलं की, त्या वेब सीरिजमधील भूमिका एका अशा अभिनेत्याला मिळाली होती, ज्याच्या पाठीशी एक मोठं प्रॉडक्शन हाऊस होतं. नमाशी म्हणाला, “महिनाभरानंतर मला समजलं की, ती भूमिका दुसऱ्याच एका अभिनेत्याला मिळाली आहे. तो अभिनेता त्या व्यक्तिरेखेला साजेसा दिसतही नव्हता. मात्र, त्याचं प्रतिनिधित्व करणारी एक एजन्सी होती आणि एका मोठ्या प्रॉडक्शन हाऊसचा पाठिंबाही त्याला होता. तेव्हा मला त्या दिग्दर्शकाने सांगितलेले शब्द आठवले. त्याने मला स्पष्टपणे सांगितलं होतं की, तू त्या भूमिकेसाठी अगदी योग्य असलास, तरी अंतिम निर्णय त्यांचाच असतो.”
या पक्षपातीपणामुळे निराश झालेल्या नमाशीने सांगितलं, “ॲमेझॉन प्राइमसारख्या मोठ्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरही दिग्दर्शकाचा अंतिम निर्णय चालत नाही. मी त्या सीरिजचं किंवा दिग्दर्शकाचं नाव सांगणार नाही, पण असं घडतं. एखाद्या अभिनेत्याला भूमिकेत घ्यायचं की नाही, हे दिग्दर्शक स्वतः ठरवू शकत नाही. तरीही कलाकारांचं ऑडिशन घेतलं जातं, त्यांना आशा दाखवली जाते आणि संपूर्ण प्रक्रियेतून जावं लागतं. त्यानंतर त्या भूमिकेला साजेसा नसलेल्या दुसऱ्याच कलाकाराची निवड केली जाते. हे योग्य नाही.” स्टारकिड्सना चित्रपटसृष्टीत सहज संधी मिळतात, या समजुतीबद्दल बोलताना नमाशीने सांगितलं, “दिग्दर्शकाला मी कोणाचा मुलगा आहे, हे माहीत होतं. कास्टिंग डायरेक्टरलाही मी कोण आहे, हे माहीत होतं. तरीही माझ्यासोबत असं घडलं. त्यामुळे स्टारकिड्सना संधी मिळणारच, असं नाही. ऐनवेळी तुमच्या जागी दुसऱ्या कलाकाराची निवड होऊ शकते.”
नमाशीला एखाद्या टॅलेंट एजन्सीमार्फत काम मिळवण्याचा विचार कधी केला होता का, असं विचारण्यात आलं. त्यावर त्याने सांगितलं की, एजन्सीच्या माध्यमापेक्षा स्वतःच्या गुणवत्तेवर त्याला अधिक काम मिळतं. नमाशी म्हणाला, “मला एका एजन्सीकडून ऑफर आली होती. त्यांच्याबरोबर माझ्या काही मीटिंग्जही झाल्या होत्या. मात्र, त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं की, त्यांच्या यादीत मी सहाव्या क्रमांकावर असेन. कारण ते आधीच पाच कलाकारांना प्रोत्साहन देत होते आणि त्यांच्यासाठी सातत्याने काम करत होते. त्यामुळे मला सतत काम मिळेल, याची ते खात्री देऊ शकत नव्हते. वर्षातून एखादी वेब सीरिज किंवा एखादा चित्रपट मिळू शकतो, असं त्यांनी सांगितलं. “मी त्यांना सांगितलं की, माझ्या गुणवत्तेच्या जोरावर, देवाच्या कृपेने, मला दर आठवड्याला चित्रपटांच्या ऑफर्स मिळतात. आयुष्यात पहिल्यांदाच माझ्यासमोर निवड करण्यासाठी इतके पर्याय आहेत. मला मोठ्या प्रॉडक्शन हाऊसकडूनच चित्रपटांच्या ऑफर्स मिळतात, असं मी म्हणत नाही; पण मला कामाच्या ऑफर्स येतात. त्यामुळे मी वर्षभर व्यग्र राहू शकतो,” असं नमाशीने स्पष्ट केलं.
याबाबत आपलं मत मांडताना नमाशीने सांगितलं, “मी त्यांना म्हटलं की, जर तुम्ही मला स्वतःहून मिळणाऱ्या कामापेक्षाही कमी काम देणार असाल, तर मग तुम्ही माझं प्रतिनिधित्व का करावं? मला त्या मीटिंगमध्ये त्यांनी ज्या पाच कलाकारांची नावं सांगितली होती, ते आज सर्वाधिक दिसणारे आणि सर्वाधिक वेब सीरिज मिळवणारे कलाकार आहेत. आपण म्हणतो की, हा कलाकार सतत दिसतो, कारण तो खूप गुणी आहे. हे खरंही असेल; पण त्याचं प्रतिनिधित्व करणारी एजन्सीही आहे, जिला स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मकडून प्रोत्साहन दिलं जातं. त्यामुळेच आपल्याला प्रत्येक ठिकाणी तेच कलाकार दिसतात.”
चित्रपटसृष्टीत सध्या ज्या पद्धतीने काम चालतं, त्याच्याशी जुळवून घ्यावं लागतं, हे मान्य करताना नमाशी म्हणाला, “पण आजच्या काळात हे असंच चालतं. तुम्हाला स्वतःचं मार्केटिंग करावं लागतं आणि त्यासाठी योग्य लोकांची मदत घ्यावी लागते. समजा, त्या पाच कलाकारांमध्ये मी असतो आणि माझ्या जागी दुसरा कोणी असता, तर कदाचित मीसुद्धा प्रत्येक ठिकाणी दिसलो असतो, पण समस्या अशी आहे की, जर तुम्ही आधीच फक्त पाच कलाकारांनाच प्रोत्साहन देण्याचं ठरवलं असेल, तर सहाव्या कलाकारासाठी संधीच उरत नाही.”
