Aakhri sawaal movie : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीनंतर संघाची विचारधारा मांडणारा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आखिरी सवाल या चित्रपटाचे स्क्रीनिंग राजधानी दिल्लीमध्ये पार पडले. हा चित्रपट आरएसएसवर आधारित असल्यामुळे हा एक प्रपोगंडा असलेला चित्रपट असल्याची टीका होऊ लागली आहे.
चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर समोर आला असून, त्यामध्ये उजव्या व डाव्या विचारधारांतील वैचारिक मतभेद आणि चर्चा दाखवली आहे. मात्र, अभिनेता संजय दत्त, नमाशी चक्रवर्ती यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटावर हा ठरवून काढलेला प्रचारक चित्रपट असल्याची टीका होत आहे. या चर्चांवर अभिनेता नमाशी चक्रवर्ती याने नाराजी व्यक्त केली.
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता स्क्रीनिंगला उपस्थित
आखिरी सवाल या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला सिनेविश्वातील कलाकारांसह राजकीय नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता या प्रसंगी उपस्थित होत्या. स्क्रीनिंगनंतर चित्रपटातील कलाकारांनी सर्व गैरसमजांवर प्रतिक्रिया देत चित्रपट पाहावा आणि नंतर मत तयार करावे, असे प्रत्युत्तर ट्रोलर्सना दिले. मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा नमाशी हा या चित्रपटात प्रमुख भूमिकेमध्ये असून, त्याने प्रत्येकाची एक विचारधारा असते; मात्र, चित्रपट बघण्यापूर्वीच मत तयार करू नका, असे मत मांडले आहे.
नमाशी ऐकतो वडील मिथुन चक्रवती यांचा खास सल्ला
“तुम्ही तुमचं मत कसं तयार करावं आणि तुमची विचारधारा कशी निवडावी हे आखिरी सवाल चित्रपट सांगतो. प्रश्न विचारणं हे अगदी योग्य असतं; पण त्याचबरोबर समोरच्याचं उत्तर ऐकून घेणंदेखील तितकंच महत्त्वाचं आहे, अशी प्रतिक्रिया नमाशी चक्रवर्ती याने व्यक्त केली आहे. चित्रपटावर होणाऱ्या टीका आणि वादाला कसं सामोरं जाणार, असा प्रश्न माध्यमांनी केला. त्यावर त्याने मत मांडले, अशा वेळी मी माझ्या वडिलांचा (मिथुन चक्रवर्ती) सल्ला कायम ऐकतो. ते सांगतात की, तुम्ही चित्रपट निर्मिती करा किंवा अभिनय करा, काम अतिशय प्रामाणिकपणे आणि पूर्ण मेहनतीनं केलं पाहिजे,”
काय आहे आखिरी सवाल चित्रपट?
आखिरी सवाल हा राजकीय ड्रामा असलेल्या चित्रपट शुक्रवारी (ता. १५) प्रदर्शित होणार असून, अगदी दोन दिवसांपूर्वी चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने सर्टिफिकेट दिले आहे. चित्रपटामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शिक्षक आणि डाव्या विचारसरणीचा विद्यार्थी यांच्यामधील वैचारिक लढाई दाखवली आहे. त्यामध्ये आणीबाणी, बाबरी मशीद यासंबंधीचे स्पष्ट उल्लेख करण्यात आले आहेत.
अभिजीत वारंग यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, उत्कर्ष नैथानी यांनी लेखन केले आहे. चित्रपटामध्ये काव्या रावत, समीरा रेड्डी, मृणाल कुलकर्णी, नीतू चंद्रा हे कलाकार प्रमुख भूमिका साकारत आहेत.
