Hurun Global Rich List 2026: २०२६मधील ‘हुरून ग्लोबल रिच लिस्ट’ नुकतीच जाहीर झाली. विशेष म्हणजे या यादीत अनेक भारतीय अब्जाधीशांची नावे आहेत. यावर्षी या यादीत ३०८ भारतीयांच्या नावांचा समावेश आहे. यातील ५७ जण नवीन आहेत. या नवीन नावांमध्ये एक बॉलीवूड निर्माता नमित मल्होत्रा याचे नाव आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून ज्या रामायण चित्रपटाची चर्चा होत आहे. या चित्रपटाचे ते निर्माता आहेत. आता या यादीत त्यांचे नाव कितव्या क्रमांकावर आहे. तसेच, निर्मात्याची एकूण संपत्ती किती आहे, हे जाणून घेऊ….

९२०४ कोटी संपत्तीचा आहे मालक

हुरून ग्लोबल रीच लिस्ट २०२६ मध्ये नमित मल्होत्रा यांचा ३३०६ वा क्रमांक आहे. तर त्यांची संपत्ती अंदाजे ९२०४ कोटींहून अधिक आहे. ते चित्रपट निर्माता म्हणून काम करतात त्याबरोबरच ते व्हिज्युअल इफेक्ट्स उद्योजक म्हणूनही लोकप्रिय आहेत.

चित्रपटांची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात नमित मल्होत्रा यांचा जन्म झाला. निर्माते नरेश मल्होत्रा हे त्यांचे वडील आहेत. नरेश मल्होत्रा यांनी १९७९ला प्रदर्शित झालेल्या ‘दुनिया मेरी जेब में’ तसेच १९८८ ला प्रदर्शित झालेल्या ‘शेहनशाह’ तसेच १९८५ ला प्रदर्शित झालेल्या साहरी बाघा यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली. तर नमित यांचे आजोबा एम. एन. मल्होत्रा हे सिनेमॅटोग्राफर होते. त्यांनी झाँसी की रानी या चित्रपटावर काम केले होते.

ईटी नाऊ(ET Now)नुसार, नमित मल्होत्रा यांनी १९९५ मध्ये वडिलांच्या गॅरेजमध्ये व्हिडिओ वर्कशॉप सुरू घेण्यास सुरुवात केली. इथूनच त्यांनी त्यांच्या व्यवसायाची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी त्यांची कंपनी व वडिलांची व्हिडीओ वर्क्स(Video Works)ही कंपनी एकत्रित केली. या कंपनीचे नाव प्राईम फोकस असे ठेवण्यात आले. विशेष म्हणजे ही कंपनी भारतापुरती मर्यादित न राहता लंडन, न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस आणि व्हॅनकुव्हर येथेही कंपनीचा विस्तार झाला.

त्यानंतर प्राईम फोकस कंपनीने डबल निगेटिव्ह (Double Negative-DNEG) या लंडनमधील व्हिज्युअल इफेक्ट्स स्टुडिओबरोबर एकत्रित करून मोठी कंपनी निर्माण केली. ‘ड्युन'(Dune) या ऑस्कर-विजेत्या चित्रपटातील व्हिज्युअल इफेक्ट्स DNEG ने तयार केले होते. सध्या नमित मल्होत्रा DNEG चे चेअरमन आणि CEO आहेत. DNEGच्या सहा चित्रपटांसाठी अकादमी अवॉर्ड्स मिळाले आहेत.

सध्या नमित मल्होत्रा ‘रामायण’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. हा चित्रपट दोन भागांत प्रदर्शित होणार आहे. त्यांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे की या चित्रपटाचा बजेट ४००० कोटी असून हा सिनेमा भारतातील महागडा चित्रपट ठरणार आहे.

हा चित्रपट नितेश तिवारी दिग्दर्शित करत आहेत. यात रणबीर कपूर रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सीतेच्या भूमिकेत साई पल्लवी दिसणार आहे. यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याबरोबरच सनी देओल, रवी दुबे, लारा दत्ता, विवेक ओबेरॉय यांसह अनेक कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. रामायण हा सिनेमा ८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.